हवाई सुरक्षेसाठी तैनात गरुडांचे पथक

तेलंगण पोलिसांचा अभिनव उपक्रम

हवाई सुरक्षेसाठी तैनात गरुडांचे पथक

हैदराबाद: प्रतिनिधी 

आकाशातून येणारी शत्रू सैन्याची ड्रोन हवेतच जेरबंद करण्यापासून महत्त्वाच्या, अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना हवाई सुरक्षा प्रदान करण्यापर्यंत कर्तव्य पार पाडण्यासाठी पक्षीराज गरुडांचे पथक सज्ज झाले आहे. तेलंगणा पोलिसांच्या या अनोख्या उपक्रमाने राष्ट्रीय सुरक्षा गार्डसह देशातील सर्व महत्त्वाच्या सुरक्षा यंत्रणांचे लक्ष वेधून घेतले आहे. 

हवाई सुरक्षेसाठी अत्यंत प्रभावी असे गरुड पथक तेलंगणा पोलिसांच्या तैनातीत आले आहे. तेलंगण पोलिसांच्या गुप्तवार्ता आणि सुरक्षा विभागाच्या वतीने पाच गरुडांना हवाई सुरक्षेचे विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. हे प्रशिक्षित गरुड हवेतून येणाऱ्या शत्रू सैन्याच्या ड्रोनवर हवेतच हल्ला चढवून त्यांना आपल्या प्रशिक्षकांकडे घेऊन येणार आहेत. त्यासाठी या गरुडांच्या पंजांना विशिष्ट प्रकारची जाळी बसवण्यात आली आहे. हे गरुड आपल्या लक्ष्याकडे झेप घेऊन हवेतील ड्रोन आपल्या पंजाच्या जाळीत पकडून प्रशिक्षकाकडे आणून देणार आहेत. 

त्याचप्रमाणे अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना हवाई सुरक्षा देण्यासाठी देखील हे गरुड पथक प्रभावी ठरणार आहे. सामान्यतः अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना हवाई सुरक्षा देण्यासाठी त्यांच्या वास्तव्याच्या ठिकाणाजवळ रेडिओ लहरी जॅमरचा वापर केला जातो. मात्र, त्यामुळे महत्त्वाच्या कामांसाठी मोबाईल फोन आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या वापरावर मर्यादा येते. गरुड पथकाची निगराणी असल्यास जॅमरची आवश्यकता लागणार नाही. त्यामुळे मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर करणे सहज शक्य होणार आहे. 

या गरुड पथकाची स्थापना सन 2019 मध्ये करण्यात आली. त्यानंतर या पथकातील पाच गरुडांना हवाई सुरक्षेचे विशेष प्रशिक्षण देण्यात आले. त्यामध्ये हवेतून परिसराचे निरीक्षण करणे, संशयास्पद हालचाली आढळल्यास प्रशिक्षकांना त्याची जाणीव करून देणे, ड्रोन हल्ले रोखणे याचा समावेश आहे. या गरुडांना प्रशिक्षण देऊन त्यांच्या कामगिरीचे मूल्यमापनही करण्यात आले आहे. त्यानंतर रंगा रेड्डी जिल्ह्यातील मोईनाबाद येथे असलेल्या गुप्तवार्ता प्रशिक्षण अकादमीमध्ये श्वान पथकाच्या पासिंग आऊट परेडमध्ये गरुड पथकाने आपल्याला मिळालेल्या प्रशिक्षणाची ठराविक प्रात्यक्षिके 28 फेब्रुवारी रोजी सादर केली. आता हे गरुड पथक हवाई सुरक्षेचे कर्तव्य पार पाडण्यासाठी सज्ज झाले आहे. 

तेलंगणा पोलिसांच्या या अनोख्या उपक्रमाने देशातील सर्व महत्त्वाच्या सुरक्षा यंत्रणांचे लक्ष वेधून घेतले आहे. या उपक्रमाबाबत चौकशी करण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा गार्ड, सीमा सुरक्षा दल, केंद्रीय राखीव पोलीस, अनेक राज्यांचे राखीव पोलीस दल इतकेच नव्हे तर फ्रान्स आणि पश्चिम आशियातील अनेक देशांनी तेलंगणा पोलिसांशी संपर्क साधला आहे. 

 

Share this article

About The Author

Post Comment

Comment List

Follow us