'इतरांकडे बोटे दाखवण्यापेक्षा स्वतःकडे वळून पहा'
पाकिस्तानच्या कांगाव्याला भारताचे चोख प्रत्युत्तर
नवी दिल्ली: प्रतिनिधी
बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने जफ्फर एक्सप्रेसचे अपहरण केल्याच्या घटनेला भारताकडून फूस लावण्यात आली आहे, असा कांगावा पाकिस्तानने केला आहे. भारताने त्याला चोख प्रत्युत्तर दिले आहे. पाकिस्तानने इतरांकडे बोटे दाखवण्याऐवजी स्वतःकडे वळून बघावे, असे भारताने सुनावले आहेकरावे
बलोच बंडखोरांना सातत्याने भारताकडून मदत केली जाते. जफर एक्सप्रेस अपहरण प्रकरणातही भारताचा हात आहे, असा आरोप पाकिस्तानने केला आहे. त्याचप्रमाणे बलोच हल्लेखोर प्रत्यक्ष हल्ल्याच्या वेळी त्यांच्या अफगाणिस्तानातील हॅण्डलर्सच्या संपर्कात होते असा आरोप करून पाकिस्तानने अफगाणिस्तानलाही या प्रकारात ओढले आहे.
भारताने पाकिस्तानचा आरोप साफ नाकारला आहे. दहशतवादी कारवायांचे केंद्र कोणत्या देशात आहे हे सगळ्या जगाला माहिती आहे. त्यामुळे पाकिस्तानी इतरांवर आरोप करण्यापेक्षा आपल्याकडे काय घडत आहे याचे अवलोकन करावे, असे भारताने म्हटले आहे.
रेल्वे अपहरण प्रकरणाने जगभरात नाचक्की झालेल्या पाकिस्तानकडून आपले अपयश लपविण्यासाठी वारंवार असत्याचा वापर केला जात आहे. बलोच लिबरेशन आर्मीने अपहरण केलेल्या एक्सप्रेसमध्ये पाकिस्तानचे सुमारे 200 लष्करी जवान आणि प्रशासकीय अधिकारी प्रवास करीत होते. बलोच लिबरेशन आर्मीने या जवान व अधिकाऱ्यांना ओलीस ठेवले असून त्या बदल्यात बलोच राजकीय कायद्यांची सुटका केली जावी, अशी मागणी पाकिस्तानकडे केली आहे.
गाडीचे अपहरण केल्यानंतर बलोच आर्मीच्या जवानांनी आतील प्रवाशांचे तीन गटात विभाजन केले. महिला, मुले व ज्येष्ठ नागरिक यांची त्वरित मुक्तता करण्यात आली. सर्वसामान्य पाकिस्तानी नागरिकांच आपले वैर नाही, अशी भूमिका घेऊन बलोच आर्मीने हे पाऊल उचललेले असतानाही पाक सैन्याने कारवाई करून आपल्या नागरिकांची सुटका केल्याची बतावणी पाकिस्तानी लष्कर आणि सरकारकडून केली जात आहे.
या अपहरण नाट्यात बळी पडलेल्यांची संख्या 23 असल्याचे पाकिस्तानकडून अधिकृतरित्या सांगितले जात आहे. दुसरीकडे पाकिस्तान सरकारने तब्बल 200 शवपेट्या क्वेट्टाकडे रवाना केल्या आहेत. बळींची संख्या 23 असताना २०० शवपेट्या कशासाठी, असा सवाल त्यामुळे उपस्थित होत आहे.
पाकिस्तान कडून काहीही दावे केले जात असले तरी या गाडीतील परतलेल्या प्रवाशांकडून विविध वृत्तवाहिन्यांना दिल्या जाणाऱ्या मुलाखती, छायाचित्र आणि व्हिडिओजच्या माध्यमातून पाकिस्तानचा खोटेपणा उघड होत आहे. बलोच लिबरेशन आर्मीकडूनही पाकिस्तानचे अवाजवी दावे पुराव्यानिशी खोडून काढण्यात येत आहेत.
Comment List