'समाजात तेढ निर्माण करणाऱ्यांची गय केली जाणार नाही'
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा इशारा
मुंबई: प्रतिनिधी
नागपूर येथे विश्व हिंदू परिषदेच्या आंदोलनानंतर झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर समाजात जाणून-बुजून तेढ निर्माण करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला आहे. पोलीस प्रशासन योग्य पद्धतीने परिस्थिती हाताळत असून नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहनही फडणवीस यांनी केले आहे.
नागपूरच्या महाल परिसरात विश्व हिंदू परिषदेच्या वतीने औरंगजेबाची प्रतिमा जाळण्यात आली. त्याबरोबरच कबर अथवा दर्ग्यावर घातली जाणारी हिरवी चादर देखील जाळण्यात आल्याचे वृत्त सर्वत्र पसरले. चादर जाण्याच्या कृतीला मुस्लिम समुदायाने आक्षेप घेतला. त्यावरून दोन्ही गटात घोषणाबाजी झाली. त्याचे पर्यावसान दगडफेकीत झाले. या दगडफेकीत अनेक वाहनांचे नुकसान झाले.
पोलिसांवरही दगडफेक करण्यात आली. त्यामुळे या परिसरातील वातावरण तणावपूर्ण असून आज या परिसरात संचारबंदी लागू करण्यात आली आहे. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि मंत्री चंद्रशेखर बावनकुळे व नागपुरातील आमदार घटनास्थळी रवाना झाले आहेत.
क्रूरकर्मा छत्रपती संभाजीनगर येथील औरंगजेबाची कबर उखडून टाकावी, अशी विश्व हिंदू परिषद आणि अन्य काही हिंदुत्ववादी संघटनांची मागणी आहे. यासाठी राज्य सरकारने पुढाकार न घेतल्यास त्या ठिकाणी कारसेवा करण्याचा इशारा विश्व हिंदू परिषदेने दिला आहे. मात्र, केंद्रीय पुरातत्त्व विभागाने या कबरीला संरक्षण दिले असल्याने राज्य सरकारला ही कबर संरक्षित करणे आवश्यक असल्याचे स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतेच दिले आहे.
Comment List