'चार दिवसात सुरू होईल भारत पाकिस्तान युद्ध'
पाक संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
इस्लामाबाद: वृत्तसंस्था
भारताने सिंधू जल कराराला स्थगिती दिल्यावरून युद्धखोरीची भाषा करणाऱ्या पाकिस्तान सरकारने आता युद्धाचे दिवसच जाहीर करून टाकले आहेत. पुढच्या चार दिवसातच भारत आणि पाकिस्तान यांच्यात युद्ध होईल, असा दावा पाक संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांनी केला आहे.
पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने या कृत्याचा बदला घेऊ, असे जाहीर केले आहे. त्याचप्रमाणे सिंधू जल करार रद्द करण्याबरोबरच दहशतवादाला पोसणाऱ्या पाकिस्तान विरोधात काही कठोर पावले देखील उचलली आहेत. त्यानंतर भारताने पाकिस्तानच्या वाट्याचे पाणी न दिल्यास पाण्यासाठी युद्ध करू, अशी भाषा पाकिस्तानकडून वारंवार केली जात आहे. नेहमीप्रमाणेच पाकिस्तानकडून भारताला अण्वस्त्रांची भीती घालण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
संभाव्य युद्धासाठी पाकिस्तानला चीन आणि तुर्की या देशांकडून शस्त्रसामग्री मिळाली आहे. अझरबैजान या देशाने देखील पाकिस्तानला पाठिंबा जाहीर केला आहे. भारतातही पाकिस्तानवर कठोर कारवाई करण्याच्या दृष्टीने बैठकांचे सत्र सुरू आहे. पहलगाम हल्ल्यानंतर दुसऱ्यांदा उद्या संरक्षण विषयक संसदीय समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. पाकिस्तानकडून मिळणाऱ्या धमक्या आणि पाकिस्तानच्या विरोधात करण्याची कारवाई, याबाबत या बैठकीत विचार केला जाणार आहे.