'छोट्या समाजात जन्मलो हे आमचे पाप आहे का?'
छगन भुजबळ यांचा रोकडा सवाल
लातूर: प्रतिनिधी
आमच्या वाट्याच्या आरक्षणात अतिक्रमण नको, एवढीच इतर मागासवर्गीयांची मागणी आहे. वास्तविक, आम्ही लोकसंख्येच्या 54 टक्के आहोत. आम्हाला मिळालेले आरक्षण अर्धेमुर्धे आहे. ते तरी धड राहू द्या. मराठा समाजाला आमच्यात घुसवू नका, अशी मागणी मंत्री छगन भुजबळ यांनी केली. छोट्या समाजात जन्माला आलो हे आमचे पाप आहे का, असा सवालह त्यांनी केला.
ओबीसी आरक्षण जाण्याच्या भीतीने रेणापूर तालुक्यातील वागदरी या गावात राहणाऱ्या 35 वर्षीय भरत कराड या युवकाने आत्महत्या केली. भुजबळ यांनी कराड कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी बोलताना ओबीसी आरक्षणाच्या बाबतीत भुजबळ आक्रमक झाले.
जे सामाजिक दृष्ट्या मागास नाहीत मात्र, आर्थिक दृष्ट्या कमजोर आहेत त्यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांचे दहा टक्के आरक्षण लागू केले. त्याचा 90% लाभ मराठा समाजातील मुला मुलींनी घेतला. मात्र, मराठा समाजाला आता आमच्यात यायचे आहे. 50% आरक्षणामध्ये इतर मागासवर्गासह मागासवर्ग, दलित, भटके विमुक्त, आदिवासी इत्यादींचा समावेश आहे, असे भुजबळ यांनी स्पष्ट केले.
मराठा समाजाला केंद्र सरकारने आर्थिक दृष्ट्या मागास प्रवर्गातून आरक्षण दिले. राज्य सरकारने मराठा आरक्षण दिले. तरीही आता ते आमच्यातून, अर्थात ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, अशी मागणी करत आहेत. दोन लाख मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यात आले आहे. त्यांना आरक्षण देण्यास आमचा विरोध नाही. आमच्या आरक्षणाला धक्का लावू नका, एवढेच आमचे म्हणणे आहे, असे भुजबळ म्हणाले.