मित्रपक्षातील मंत्र्यांनी दिल्या 'देवा भाऊं'च्या जाहिराती
आमदार रोहित पवार यांचा कोट्यवधीच्या जाहिरातबाजीवर आक्षेप
मुंबई: प्रतिनिधी
गणेश विसर्जनाच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सर्व वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या जाहिराती आणि फलक मित्रपक्षाच्या मंत्र्यांनी खुद्द देवाभाऊंना कल्पना न देता केल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी केला आहे. राज्य विविध अडचणींना तोंड देत असताना अशी कोट्यवधीची उधळपट्टी अयोग्य असल्याचा आक्षेप त्यांनी घेतला.
देवेंद्र फडणवीस हे छत्रपती शिवाजी महाराज यांना वंदन करीत असल्याचे छायाचित्र असलेल्या या जाहिराती चांगल्याच चर्चेत आल्या. मराठा आरक्षण आंदोलन स्थगित झाल्याचे श्रेय पदरात पाडून घेण्यासाठी भारतीय जनता पक्षाची ही प्रसिद्धी मोहीम असल्याचेही सांगण्यात आले. त्यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना, आम्ही श्रेयवादाची लढाई लढत नसल्याचे स्पष्ट करावे लागले.
राज्यात शेतकरी आत्महत्या करीत आहेत. अतिवृष्टीने मोठे संकट राज्यासमोर उभे केले आहे. अशा परिस्थितीत केवळ जाहिरातबाजीवर कोट्यावधी रुपये उधळणे अयोग्य आहे, अशी टीका रोहित पवार यांनी केली. एवढा मोठा खर्च करणारे मंत्री कोण? त्यासाठी एवढा निधी कोठून आला, असे सवाल उपस्थित होत असून ही जाहिरातबाजी करणाऱ्या मंत्र्यांनी समोर येऊन खुलासा करावा, असे आव्हान त्यांनी दिले.
कोणतीही जाहिरात करताना जाहिरातदाराचे नाव नमूद करणे आवश्यक असताना इतक्या मोठ्या प्रमाणावर या निनावी जाहिराती का करण्यात आल्या? त्यासाठी लागणारा पैसा कुठून आणला, ते संबंधितांनी स्पष्ट करावे, अशी मागणीही त्यांनी केली.