- राज्य
- मनोज राणे यांचा भाजपला राम राम
मनोज राणे यांचा भाजपला राम राम
शिवसेना शिंदे गटात शेकडो कार्यकर्त्यांसह प्रवेश
ठाणे: प्रतिनिधी
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका तोंडावर असतानाच भारतीय जनता पक्षाच्या कामगार आघाडीचे प्रदेश सचिव मनोज राणे यांनी भाजपला राम राम करून शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री प्रताप सरनाईक आणि नीतेश राणे यांच्या नेतृत्वाखाली काम सुरू केले असल्याचे त्यांनी सांगितले.
विधानसभा निवडणूक झाल्यानंतर महाविकास आघाडीतील घटक पक्षातून महायुतीतील पक्षांमध्ये मोठ्या प्रमाणावर आवक सुरू झाली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी स्थानिक राजकीय गणितांनुसार महायुतीतील घटक पक्षांमध्ये देखील आवक जावक होत आहे.
मनोज राणे हे मंत्री नितेश राणे यांचे निकटवर्तीय मानले जातात. त्यांच्या पक्ष त्यागामुळे विशेषतः मीरा-भाईंदर महापालिका क्षेत्रात भाजपला मोठा धक्का बसला आहे तर शिवसेना शिंदे गटाची ताकद उल्लेखनीय प्रमाणात वाढली आहे. शिंदे, सरनाईक, राणे यांच्या नेतृत्वाखाली विकासाचा अजेंडा घेऊन पक्षाच्या संघटनात्मक कामात कार्यरत होत असल्याचे राणे यांनी पक्षप्रवेश करताना सांगितले.