- राज्य
- हिंदू आध्यात्मिक सेवा संस्थेची मासिक बैठक संपन्न
हिंदू आध्यात्मिक सेवा संस्थेची मासिक बैठक संपन्न
दगडूशेठ हलवाई मंडळाचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी यांचा विशेष सत्कार
पुणे: प्रतिनिधी
हिंदू आध्यात्मिक सेवा संस्थेची मासिक बैठक पुणे महानगर संघचालक रवींद्र वंजारवाडकर यांच्या विशेष उपस्थितीत आणि संस्थेचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल यांच्या अध्यक्षतेखाली पुणे शहरातील विविध मठ–मंदिरांचे प्रमुख पदाधिकारी तसेच मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाली.
बैठकीच्या प्रारंभी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिराचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी यांचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी संस्थेचे महामंत्री किशोर येनपूरेही उपस्थित होते.
अलीकडेच इंदूर येथे आयोजित अखिल भारतीय बैठकीच्या संदर्भात सविस्तर चर्चा झाली. तसेच आगामी कार्यक्रमांची रूपरेषा मठ–मंदिर, शाळा, महाविद्यालये, मातृशक्ती, प्रशासकीय व युवा विभाग या अनुषंगाने विचारविनिमय करण्यात आला.
बैठकीदरम्यान अध्यक्ष गोयल यांच्या हस्ते पुणे महानगर संघचालक रवींद्र वंजारवाडकर यांचा विशेष सत्कार करण्यात आला. आपल्या अध्यक्षीय भाषणात गोयल म्हणाले की, “संस्थेचे कार्य सर्व सदस्यांच्या सहकार्याने संपूर्ण विश्वात पोहोचेल आणि समाजात प्रतिष्ठित ठरेल.”
कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी आपल्या प्रेरणादायी उद्गारात वंजारवाडकर म्हणाले की, “संघशताब्दीच्या निमित्ताने सर्व मठ–मंदिरांनी हा संकल्प करावा की भारतात कोणीही दुःखी राहणार नाही, अस्पृश्यतेचा अंत होईल, कुटुंब व्यवस्था बळकट बनेल आणि प्रत्येक नागरिक धर्म व राष्ट्र यांना सर्वोच्च मानेल.”
या प्रसंगी स्वामी नारायण संस्थेचे विश्वस्त राधेश्याम अग्रवाल, फर्ग्युसन कॉलेजचे उपप्राचार्य डी. डी. कुंभार, शेगावच्या अनुपमा ताई दरक, धर्मादाय क्षेत्रातील ॲड. कीर्ती कोल्हटकर, गंगानाथ महाराज ट्रस्टचे सिद्धेश कांबळे, शिवमंदिर विश्वस्त अशोक शेठ रुकारी, अयप्पा स्वामी विश्वस्त राजन बाबू, सबरीमाला विश्वस्त निमिष नायर, अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप सारडा यांनी केले. बैठकीचा समारोप सामूहिक पसायदानाने झाला.