- देश-विदेश
- पंतप्रधान मोदी यांच्या भूमिकेला विरोध केला म्हणूनच...
पंतप्रधान मोदी यांच्या भूमिकेला विरोध केला म्हणूनच...
शरद पवार यांनी केला केजरीवाल यांच्या अटकेचा निषेध
मुंबई: प्रतिनिधी
आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय निमंत्रक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना करण्यात आलेली अटक हा सत्तेचा गैरवापर असल्याचा आरोप करून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सक्तवसुली संचालनालयाच्या या कारवाईचा निषेध केला आहे. सूडबुद्धीतून करण्यात आलेल्या या कारवाईची किंमत भारतीय जनता पक्षाला चुकवावी लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.
भाजपा कडून मोठ्या प्रमाणावर सत्तेचा गैरवापर होत आहे. सूडबुद्धीने राजकीय विरोधकांना अटक करण्यात येत आहे. यापूर्वी झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना अटक करण्यात आली. आता अरविंद केजरीवाल यांना अटक करण्यात आली. यापुढे आणखी कोणा कोणाला अटक होईल हे काही सांगता येत नाही. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर विरोधकांमध्ये दहशत आणि भीती पसरविण्याचे काम सत्ताधाऱ्यांकडून केले जात आहे, असा आरोप पवार यांनी केला.
केंद्र सरकारची री ओढता राज्यात आपल्या स्वतंत्र बुद्धीने धोरणे निश्चित करणाऱ्या नेत्यांना केंद्र सरकारकडून अटक करण्यात येत आहे. अरविंद केजरीवाल हे खुद्द राजधानी दिल्लीत बसून राज्यकर्त्यांच्या धोरणाला विरोध करीत असल्यामुळेच त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. ही कारवाई अत्यंत चुकीची आहे, असेही पवार यांनी नमूद केले.