- देश-विदेश
- कुत्र्याची शेपटी वाकडी ती वाकडीच...
कुत्र्याची शेपटी वाकडी ती वाकडीच...
पाकव्याप्त काश्मीरमध्ये पुन्हा दहशतवादी तळ सक्रीय
नवी दिल्ली: प्रतिनिधी
ऑपरेशन सिंदूरद्वारे भारताने पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवला असूनही पाकिस्तानचे शेपूट वाकडेच राहिले आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये दहशतवादी तळ पुन्हा सुरू झाले असून घुसखोरी करण्यासाठी तिथे प्रशिक्षणही दिले जात आहे, अशी माहिती गुप्तचर यंत्रणांनी सीमा सुरक्षा दलाला दिली आहे. त्यामुळे सध्या स्थगित करण्यात आलेले ऑपरेशन सिंदूर भारताकडून पुन्हा सुरू केले जाण्याची शक्यता आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूरअंतर्गत पाकव्याप्त जम्मू काश्मीरमधील नऊ दहशतवादी तळ उध्वस्त केले. त्याच प्रमाणे जिथून भारतीय लष्करी तळांवर आक्रमण करण्यात आले ते हवाई तळ देखील नष्ट करण्यात आले. सिंधू नदीच्या पाण्याच्या वाटपाबाबत करार स्थगित करण्यात आला. व्यापार थांबवण्यात आला.
या सर्व पार्श्वभूमीवर पाकिस्तानच्या नाकी नऊ आले असले तरी देखील पाकिस्तानला शहाणपण आले नसल्याचे दिसून येत आहे. पाकव्याप्त काश्मीमधील दहशतवादी तळ पुन्हा कार्यरत झाले असून भारतात घुसविण्यासाठी अतिरेक्यांना प्रशिक्षण दिले जात आहे, अशी माहिती सीमा सुरक्षा दलाचे महानिरीक्षक शशांक आनंद यांनी पत्रकार परिषदेत दिली. पाकव्याप्त काश्मीरमधील सर्व घडामोडींवर भारतीय गुप्तचर बारकाईने नजर ठेवून असल्याचेही त्यांनी सांगितले.
पाकिस्तानचे कंबरडे मोडल्यावर भारत आणि पाकिस्तानात युद्धविराम झाल्याची घोषणा करण्यात आली. मात्र, ऑपरेशन सिंदूर थांबवण्यात आलेले नाही. ते केवळ स्थगित करण्यात आले आहे. पाकिस्तानकडून पुन्हा आगळीक घडल्यास ते पुन्हा सुरू करण्यात येईल, असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी यापूर्वीच दिला आहे. त्याचप्रमाणे भारतात यापुढे घडलेली कोणतीही दहशतवादी कारवाई हे भारतावरील आक्रमण समजले जाईल. त्यामुळे त्याची फळे दहशतवाद्यांबरोबरच पाकिस्तानी सैन्याला देखील भोगावी लागतील, याची स्पष्ट जाणीव पाकिस्तानला करून देण्यात आली आहे.