छत्रपती कारखान्याच्या अध्यक्षपदी पृथ्वीराज जाचक!
बारामती, प्रतिनिधी
भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी पृथ्वीराज साहेबराव जाधव यांची तर उपाध्यक्षपदी कैलास रामचंद्र गावडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे व पृथ्वीराज जाचक यांच्या नेतृत्वाखालील श्री जय भवानी माता पॅनेलने २१ पैकी २१ जागा जिंकून निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले होते. या निवडणुकीपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पृथ्वीराज जाचक यांचे अध्यक्षपदासाठी नाव घोषित केले होते, त्यामुळे अध्यक्षपदी पृथ्वीराज जाचक यांची निवड निश्चित होती, मात्र उपाध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार, याची उत्सुकता होती. बुधवारी (दि २८) सकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या काटेवाडी येथील निवासस्थानी क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे यांच्या प्रमुख उपस्थितीत कारखान्याच्या विद्यमान संचालक मंडळाची बैठक पार पडली, या बैठकीत उपमुख्यमंत्री पवार यांच्या सूचनेनुसार अध्यक्षपदासाठी जाचक तर उपाध्यक्ष पदासाठी गावडे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले, यावेळी पवार यांनी संचालक मंडळाला सूचना दिल्या. यानंतर छत्रपती कारखान्याच्या सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांच्या अध्यक्षतेखाली निवड प्रक्रिया पार पडली. यामध्ये अध्यक्ष पदासाठी जाचक तर उपाध्यक्ष पदासाठी गावडे यांचे नामनिर्देशन अर्ज दाखल झाले, यानंतर अध्यक्षपदी पृथ्वीराज जाचक तर उपाध्यक्षपदी कैलास गावडे यांची बिनविरोध निवड नावडकर यांनी जाहीर केली. या निवडीनंतर नवनिर्वाचित अध्यक्ष उपाध्यक्षांचा सत्कार वैभव नावडकर यांच्या हस्ते करण्यात आला. यानंतर कार्यकारी संचालक अशोक जाधव यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व संचालक मंडळाचा सत्कार केला, कामगार नेते युवराज रणवरे यांनी कामगारांच्या वतीने नवनिर्वाचित संचालक मंडळांचा सत्कार केला. दरम्यान यावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यास नवनिर्वाचित अध्यक्ष उपाध्यक्ष सचालक मंडळाच्या वतीने पुष्पहार अर्पण करण्यात आला.
.
"छत्रपती" ला गतवैभव प्राप्त करू: जाचक
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासह सर्व सभासदांचे, कामगारांचे मी मनापासून आभार मानतो. आभाराला शब्द कमी पडत आहेत. फार मोठे यश सभासदांनी आम्हाला दिले. सभासदांना दिलेले आश्वासन आम्ही पाळू. छत्रपती कारखान्याला गत वैभव प्राप्त करून देण्यासाठी आम्ही सर्व संचालक मंडळ कटीबद्ध आहोत. -पृथ्वीराज जाचक, नवनिर्वाचित अध्यक्ष.
मारुती ८०० कार मधून जाचक दाखल
छत्रपती कारखान्याच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीसाठी पृथ्वीराज जाचक हे जुन्या मारुती ८०० या कारमधून छत्रपती कारखान्याच्या कार्यालयात दाखल झाले. त्यांचे वडील ,कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष स्व. साहेबराव जाचक हे एम एच १२, ए.एन ५०६५ क्रमांक असलेली मारुती कार वापरत होते. ही कार जाचक यांनी जपून ठेवले आहे, याच मारुती कारणे पृथ्वीराज जाचक छत्रपती कारखान्याच्या कार्यालयात पोहोचले. कारमधून उतरल्यानंतर त्यांनी कारखान्याच्या प्रशासकीय इमारती. पुढे नतमस्तक झाले. कारखान्याच्या अध्यक्षपदाच्या निवडीनंतर बोलताना ते भाऊ देखील झाले. २२ वर्षाच्या संघर्षानंतर त्यांची अध्यक्षपदी झालेल्या निवडीमुळे फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली.