- देश-विदेश
- 'एक महिन्यात भाजपमध्ये प्रवेश करा, नाही तर...'
'एक महिन्यात भाजपमध्ये प्रवेश करा, नाही तर...'
दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या मंत्री आतिशी यांचा गंभीर आरोप
नवी दिल्ली: प्रतिनिधी
आपल्या एका निकटवर्तीयाच्यामार्फत आपल्याला भारतीय जनता पक्षात प्रवेश करण्यासाठी धमकी देण्यात आली आहे. एक महिन्यात आम आदमी पक्ष सोडून भाजपमध्ये न आल्यास सक्त वसुली संचालनालय तुम्हाला गजाआड करेल, असे आपल्याला सांगण्यात आले आहे, असा गंभीर आरोप आप सरकारच्या मंत्री आतिशी यांनी पत्रकार परिषदेत केला.
दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय निमंत्रक अरविंद केजरीवाल आणि ज्येष्ठ मंत्री मनीष सिसोदिया यांना गजाआड करून आप मध्ये फूट पडणार नाही, हे भाजपच्या लक्षात आले आहे. त्यामुळे इथून पुढच्या काळात मी स्वतः आणि सौरभ भारद्वाज, राघव चड्ढा, दुर्गेश पाठक या मंत्र्यांनाही सक्तवसुली संचालनायमार्फत अटक करण्यात येणार आहे, असेही आतिशी यांनी सांगितले.
... तर भाजपाचे फावेल
मुख्यमंत्री केजरीवाल यांना ईडीने अटक केली असली तरीही ते मुख्यमंत्री पदाचा राजीनामा देणार नाहीत. तसे केल्यास भाजपचे फावण्याची शक्यता आहे. यापुढे मुख्यमंत्र्यांना अटक करणे आणि त्यांनी राजीनामा दिल्यावर संवैधानिक पेच निर्माण झाल्यामुळे राष्ट्रपती राजवट लागू करणे, हा पायंडाच भाजप पाडू शकेल. शिवाय लोकप्रतिनिधी कायद्यानुसार केवळ आरोप होऊन राजीनामा देण्याची आवश्यकता नाही. त्यासाठी आरोप सिद्ध होणे आणि विशिष्ट कालावधीची शिक्षा होणे गरजेचे आहे, याकडे आतिशी यांनी लक्ष वेधले.