- देश-विदेश
- सीमावादातून कंबोडिया आणि थायलंड यांच्यात तणाव
सीमावादातून कंबोडिया आणि थायलंड यांच्यात तणाव
सैन्याची जमवाजमव, पूर्व आशियातील शांतता धोक्यात
बँकॉक: वृत्तसंस्था
पूर्वापार चालत आलेल्या सीमावादातून कंबोडिया आणि थायलंड या दोन देशांमध्ये पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला आहे. दोन्ही देशांनी वादग्रस्त सीमेवर सैन्याची जमवाजमव केली असून त्रयस्थ देशांची मध्यस्थी निष्फळ ठरली आहे. त्यामुळे दोन्ही देशांमध्ये युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाली असून त्यामुळे पूर्व आशियातील शांतता धोक्यात आली आहे.
कंबोडिया आणि थायलंड या देशात सीमारेषेवरून पूर्वापार वादविवाद आहे. पूर्वी कंबोडिया ही फ्रान्सची वसाहत होती. त्यावेळी फ्रान्सने कंबोडिया आणि थायलंड यांच्यामध्ये सीमारेष निश्चित केली. या दोन देशांमध्ये सुमारे ८१७ किलोमीटर लांबीची सीमारेषा आहे.
ही सीमारेषा सन १९०७ मध्ये प्रथम नकाशावर आली. मात्र, ही सीमा वादग्रस्त ठरली आहे. या सीमेवर असलेले एक प्राचीन हिंदू मंदिर नक्की कंबोडियाच्या हद्दीत आहे की थायलंडच्या हद्दीत यावरून दोन्ही देशात वाद झाला होता.
या वर्षी २८ मे रोजी दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये वादग्रस्त सीमारेषेवर झटापट झाली. त्यामध्ये एका कंबोडियन सैनिकाचा मृत्यू झाला. या घटनेपासून दोन्ही देशांमध्ये तणाव वाढत आहे. कंबोडियातील सैनिक व नागरिक थायलंडमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप थायलंडकडून केला जातो. त्यामुळे आपल्याला नाईलाजाने सैन्य शक्तीचा वापर करावा लागतो, असा थायलंडचा दावा आहे.
सीमारेषेवरील झटापटीनंतर कंबोडियाने सीमेवरील सैन्यात वाढ केली आहे. त्यामुळे अर्थातच थायलंडनेदेखील सीमेवरील सैन्य वाढवले आहे. आपली भूमिका संघर्षाची नाही तर बचावाची आहे. आपण स्वतःहून आक्रमण करणार नाही. मात्र, कंबोडियाने आगळीक केल्यास त्याला चोख प्रत्युत्तर देण्याची आमच्या सैन्यदलाची तयारी आहे, असा इशारा थायलंडने दिला आहे.
कंबोडिया आणि थायलंड या देशांमधील तणाव कमी करण्यासाठी मलेशियाचे पंतप्रधान अन्वर इब्राहिम यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा उपयोग झाला नाही. सीमेवरील चार भागांच्या हक्कावरून कंबोडिया आंतरराष्ट्रीय न्यायालयात दाद मागणार आहे. मात्र, हा वाद आंतरराष्ट्रीय न्यायालयात नेण्यास थायलंड च विरोध आहे. द्विपक्षीय वाटाघाटीतूनच सीमावादावर तोडगा काढला जाऊ शकतो, ही थायलंडची भूमिका आहे. मात्र, कंबोडियाकडून द्विपक्षीय वाटाघाटींच्या प्रस्तावाला केराची टोपली दाखवण्यात आल्याचे थायलंडकडून सांगण्यात येत आहे.