- राज्य
- आम्ही शांत आहोत, शांत राहू द्या!
आम्ही शांत आहोत, शांत राहू द्या!
मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
मुंबई: प्रतिनिधी
आम्ही मागील दोन वर्ष शांततेत आंदोलन करत आहे. आमच्याकडून कधीही लोकशाही, कायदा आणि नियमांचा भंग झालेला नाही. आताही आम्ही शांत आहोत आणि शांतच राहू द्या, अशा शब्दात मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला इशारा दिला.
पोलिसांनी आंदोलकांना आझाद मैदान खाली करण्याची नोटीस दिल्यानंतर जरांगे पाटील यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. न्यायालयाने आदेश दिल्यानंतर केवळ चार तासांमध्ये आमची वाहने रस्त्यावरून बाहेर निघाली आहे. न्यायालयाच्या प्रत्येक आदेशाचे आम्ही काटेकोर पालन करू, न्यायदेवतेवर आमचा विश्वास आहे. न्यायदेवता आम्हाला न्याय देईल, असे जरांगे पाटील यांनी स्पष्ट केले.
... काय अडचणी आहे ते आम्हाला सांगा
हैदराबाद गॅझेट लागू करण्यासह अन्य मागण्या मान्य झाल्याशिवाय आम्ही जागेवरून हलणार नाही, असा इशारा जरांगे पाटील यांनी दिला. सारे मराठा कुणबी आहेत हे मान्य करायला काय हरकत आहे? हैदराबाद गॅझेट लागू करायला काय अडचणी आहेत, ते आम्हाला सांगा. सगे सोयरेच्या अध्यादेशाची अंमलबजावणी झालीच पाहिजे, असे जरांगे पाटील यांनी बजावले.
जागच्या जागी प्रमाणपत्र वाटप सुरू करा
राज्यभरात 58 लाख सगे सोयऱ्यांच्या नोंदी सापडल्या आहेत. त्या त्या ग्रामपंचायतींनी त्या नोंदीनुसार त्वरित जागेवरच कुणबी प्रमाणपत्र वाटप सुरू केले पाहिजे, अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली. ही मागणी त्वरित मान्य झाली पाहिजे. अन्यथा आपण मरण पत्करू पण जागेवरून उठणार नाही, असा इशारा त्यांनी दिला.
मराठा आरक्षण आंदोलनात सहभागी असलेल्या युवकांवरील गुन्हे त्वरित मागे घेण्यात यावे आणि या आंदोलनात दिलेल्या आंदोलकांच्या कुटुंबांना आर्थिक मदत मिळावी, या मागण्यांवर आपण ठाम आहोत. या मागण्याही त्वरित मान्य कराव्या, असेही जरांगे पाटील म्हणाले.