- राज्य
- गणितात पास करण्यासाठी उकळले लाखो रुपये
गणितात पास करण्यासाठी उकळले लाखो रुपये
प्राध्यापकासह चार जणांना गुन्हे शाखेने केले जेरबंद
पुणे: प्रतिनिधी
विद्येच्या माहेरघरात गणिताच्या परीक्षेत उत्तीर्ण करण्यासाठी प्राध्यापकाने विद्यार्थ्यांकडून पुन्हा उत्तरपत्रिका लिहून घेऊन त्यासाठी लाखो रुपये उकळण्याचा प्रकार पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने उघडकीला आणला आहे. या प्रकरणी एका प्राध्यापकासह चौघांना अटक करण्यात आली आहे.
अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षात गणिताची परीक्षा जड गेलेल्या आणि नापास होण्याची भीती असलेल्या विद्यार्थ्यांना हेरून पार्वतीबाई गेनबा मोझे महाविद्यालयातील प्रा. प्रतीक सातव याने परीक्षेच्या दिवशी रात्री खुद्द महाविद्यालयातच पुन्हा उत्तर पत्रिका लिहून घेतल्या आणि उत्तीर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांकडून प्रत्येकी १० ते ५० हजार रुपये लाटले.
दरम्यान, पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेला या प्रकारचा सुगावा लागला. पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकून प्राध्यापक सातव यांच्यासह आदित्य खिलारे, अमोल नागरगोजे आणि अनिकेत रोडे यांना अटक केली. त्यांच्याकडून उत्तर पत्रिकांचा गठ्ठा, उत्तर पत्रिका ठेवण्याच्या लॉकर रुमची चावी आणि २ लाख ६ हजार रुपयांची रोख रक्कम जप्त केली आहे.
या प्रकाराने शिक्षणक्षेत्रात मोठी खळबळ माजली असून गुन्हे शाखेत गुन्हा नोंदवून तपास करण्यात येत आहे. या प्रकरणात आणखी काही जण सहभागी असल्याचा पोलिसांचा संशय आहे.