- राज्य
- आला बाप्पाचा रथ मला नाचू दे; गाण्यावर महाराष्ट्र धरणार ठेका
आला बाप्पाचा रथ मला नाचू दे; गाण्यावर महाराष्ट्र धरणार ठेका
तरुणाईच्या संघर्षाची कहाणी सांगणाऱ्या ‘बॅच नं. 22’ या चित्रपटाची घोषणा
Lपुणे : प्रतिनिधी
आपली स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेक तरुण-तरुणींची झुंज सुरूच असते. त्यासाठी गाव सोडून शहरात दाखल होणाऱ्या या तरुणांचे संघर्ष, त्यांच्यातील मैत्रीची नाती आणि ध्येयाप्रतीची निष्ठा याचं चित्रण करणारा, योगीराज किरण एंटरटेनमेंट निर्मित मराठी चित्रपट ‘बॅच नं. 22’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. खास गणेशोत्सवाच्या निमित्ताने ‘बॅच नं. 22’ मधील गणरायाचा जयघोष आणि जल्लोष करणारे 'आला बाप्पाचा रथ मला नाचू दे'' हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.
या सोहळ्यास अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, डॉ. विशाल भेदूरकर आणि विक्रमसिंह राजेभोसले (संचालक, ज्ञानज्योती स्पर्धा परीक्षा केंद्र, पुणे) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या सोहळ्यात निर्माता योगीराज किरण बाजीराव झुरुंगे, डीओपी दिनेश कंदरकर, लेखक अमित बेंद्रे, संगीतकार सागर शिंदे, कार्यकारी निर्माता सचिन वाडकर तसेच चित्रपटातील प्रमुख कलाकार निखिल चव्हाण, प्राजक्ता गायकवाड, योगेश तनपुरे, यशा पाळणकर आणि योगीराज उपस्थित होते.
'आला बाप्पाचा रथ मला नाचू दे'' या गाण्यांचे गीतकार आणि सागर शिंदे असून गायक हर्षवर्धन वावरे यांनी स्वरसाज चढवला आहे. तर चित्रपटाची कथा आजच्या अशा तरुणांची आहे जे मोठी स्वप्न उराशी बाळगून गाव सोडून शहरात येतात. अभ्यास, संघर्ष, अडथळे आणि त्याचबरोबर आयुष्यात येणाऱ्या भावनिक चढउतारांना सामोरे जाताना त्यांच्या मैत्रीची नाती अधिक दृढ होत जातात. “कितीही संकटं आली तरी ध्येयापासून कधी विचलित होऊ नये” हा सकारात्मक संदेश हा सिनेमा देणार आहे.
दिग्दर्शक सचिन सुधाकर वाघ यांनी सांगितले की, “ ‘बॅच नं. 22’ मध्ये आम्ही तरुणाईच्या कथे बरोबरच मनोरंजनालाही प्राधान्य दिलं आहे. या कथेत भावना, संघर्ष आणि मनोरंजनाचा योग्य समतोल साधण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे. टीमच्या सहकार्यामुळे हा प्रयत्न नक्कीच प्रेक्षकांना भावेल, असा मला विश्वास आहे.”
या चित्रपटाचे प्रोडक्शन डिझाईन पांडव एंटरप्राइजेस नी केले आहे. चित्रपटाचे चित्रीकरण १ सप्टेंबर रोजी सुरू होणार आहे, असे निर्माते योगीराज किरण बाजीराव झुरुंगे यांनी सांगितले.