- राज्य
- 'अपघाताने पुढारी झालेल्यांचे हे राजकारण...'
'अपघाताने पुढारी झालेल्यांचे हे राजकारण...'
राधाकृष्ण विखे पाटील यांची प्रा लक्ष्मण हाके यांच्यावर टीका
मुंबई: प्रतिनिधी
समाजासाठी कोणतेही योगदान नसताना देखील केवळ अपघाताने पुढारी झालेले नेते समाजात विद्वेष निर्माण करण्याचे राजकारण करीत आहेत, अशा शब्दात मराठा आरक्षण देण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी इतर मागासवर्गीयांचे नेते प्रा लक्ष्मण हाके यांच्यावर टीका केली आहे.
मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळणे सुलभ व्हावे, यासाठी राज्य सरकारने हैदराबाद गॅझेटियर लागू करण्याचा शासन निर्णय जारी केल्यानंतर आपले आरक्षण डोक्यात आल्याची भावना ओबीसी नेत्यांमध्ये निर्माण झाली आहे. त्यामुळे त्यांच्याकडून सरकारसह मराठा समाजावर सातत्याने टीका केली जात आहे. टीका करणाऱ्यांमध्ये प्रा लक्ष्मण हाके आघाडीवर आहेत.
त्यांच्या टिकेचा समाचार घेताना विखे पाटील म्हणाले की, मराठा समाज त्यांच्या हक्कासाठी संघर्ष करत आहे. त्यांच्यावर टीका करण्याचे कोणतेही कारण नाही. ओबीसी समाजाला आरक्षण देण्यात आले त्यावेळी मराठा समाजाने त्याला विरोध केल्याचे एकही उदाहरण नाही, असे त्यांनी निदर्शनास आणून दिले.
ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही हा सरकारचा शब्द आहे. त्यामुळे प्रा हाके यांनी मुक्ताफळे उधळणे त्वरित थांबवावे. मराठा समाजावर टीका करण्याचे काहीही कारण नाही. समाजाचे पुढारपण करण्यास कोणाचीही हरकत नाही. मात्र, त्यासाठी इतर समाजावर टीका करण्याचा कोणालाही अधिकार नाही, असेही विखे पाटील म्हणाले.
'पराभूत नेत्यांसाठी आरक्षणाचा विचार'
राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्यावरही कठोर टीका केली. भावी मुख्यमंत्री म्हणून मिरवणारे हे नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिलेले आरक्षण न्यायालयात टिकवू शकले नाहीत. मराठा आरक्षणाबद्दल यांना काहीही सोयर सुतक नाही. पराभवाच्या धक्क्यातून ते अजून बाहेर आलेले नाही. त्यांनी आत्मचिंतन करण्याची गरज आहे, असे म्हणतानाच विखे पाटील यांनी, अशा पराभूत नेत्यांच्या पुनर्वसनासाठी काही आरक्षण देता येईल का, असा विचार सुरू आहे, असा उपहासात्मक टोला लगावला.