- राज्य
- रेल्वे पोलीस दलाच्या निरीक्षकासह तेरा शिपाई निलंबित
रेल्वे पोलीस दलाच्या निरीक्षकासह तेरा शिपाई निलंबित
दागिने अथवा रोकड घेऊन जाणाऱ्या प्रवाशांना लुबाडण्याचे प्रकरण
मुंबई: प्रतिनिधी
ठाणे आणि पनवेल रेल्वे स्थानकावरून लांब पल्ल्याच्या मेल व एक्सप्रेसमधील प्रवाशांना लुबाडले जात असल्याच्या प्रकारांवरून रेल्वे पोलिस दलातील पोलीस निरीक्षक आणि १२ शिपायांना निलंबित करण्यात आले आहे. अनेक प्रवाशांनी केलेल्या तक्रारीची दखल घेऊन ही कारवाई करण्यात आली.
लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्यांपैकी ज्यांच्याजवळ दागिने अथवा अधिक प्रमाणात रोकड असण्याची शक्यता आहे, अशा प्रवाशांना हेरून त्यांच्या सामानाची तपासणी करायची. ही तपासणी देखील सीसीटीव्ही कॅमेरे नसलेल्या खोलीत करायची. दागिने अथवा रोकड आढळल्यास ती आपल्याच मालकीची असल्याचे सिद्ध करायला सांगायचे.
प्रवासाच्या वेळी दागिन्यांच्या पावत्या किंवा रोकडसंबंधी व्यवहारांची कागदपत्रे प्रवाशांजवळ नसल्याने कारवाईची धमकी देऊन त्यांची लुबाडणूक करायची, असे प्रकार खुद्द रेल्वे पोलिसांकडूनच घडत असल्याच्या तक्रारी अनेक प्रवाशांनी केल्या होत्या.
या तक्रारींची दखल घेऊन रेल्वे पोलीस दलाने संबंधित पोलिसांवर कारवाई केली आहे. ज्या ठिकाणी गणवेशातील वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित असतील आणि सीसीटीव्ही कॅमेरे असतील अशाच ठिकाणी प्रवाशांनी पोलिसांना आपल्या सामानाची तपासणी करू द्यावी, असे आवाहन रेल्वे पोलीस दलाच्या वतीने प्रवाशांना करण्यात आले आहे. प्रवाशांकडून देखील सामानाच्या तपासणीबाबत पोलिसांना दिशा निर्देश द्यावे आणि ते स्थानकामध्ये सार्वजनिकरित्या प्रसिद्ध करावे, अशी मागणी केली जात आहे.