- राज्य
- निवडणुकांच्या अनुषंगाने लवकरच सर्व जिल्हाधिकाऱ्यांची बैठक
निवडणुकांच्या अनुषंगाने लवकरच सर्व जिल्हाधिकाऱ्यांची बैठक
निवडणूक आयोगाने केले ऑनलाइन बैठकीचे आयोजन
मुंबई: प्रतिनिधी
दीर्घकाळ लांबणीवर पडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या वर्षा अखेरीस होणार आहेत. त्यादृष्टीने प्रशासनाने जय्यत तयारी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून निवडणूक आयोगाने 10 जुलै रोजी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांची ऑनलाईन बैठक आयोजित केली आहे. त्या संदर्भात सर्व विभागीय आयुक्तांना पत्र रवाना करण्यात आले असून सर्व जिल्हाधिकारी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठकीत सहभागी होणार आहेत.
कोरोना महामारी, आरक्षित जागांचा न्यायप्रविष्ठ वाद, राजकीय सोय गैरसोय अशा अनेक कारणांमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दीर्घकाळ प्रलंबित राहिले आहेत. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांवर प्रशासक राज सुरू आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कारभारात लोकप्रतिनिधींचा समावेश नसणे हे लोकशाहीच्या दृष्टीने अयोग्य असल्याची टिप्पणी करून सर्वोच्च न्यायालयाने या निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत.
या आदेशानुसार निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली आहे. प्रभागाच्या रचनेचे आदेश स्थानिक प्रशासनाला देण्यात आले आहेत. प्रभाग रचना, गट रचना, मतदार यादी अद्ययावत करणे या बाबी पूर्ण झाल्यानंतर या वर्षाच्या अखेरीला किंवा नववर्षाच्या सुरुवातीला 32 जिल्हा परिषदा, 336 पंचायत समित्या, 29 महानगरपालिका, 248 नगरपरिषदा, 42 नगरपंचायत यांच्या निवडणुका होत आहेत. या निवडणुकीच्या तयारीचा आढावा या बैठकीत घेण्यात येणार आहे.