- राज्य
- ... तर मग हा मोर्चा न्यायचा कुठे?
... तर मग हा मोर्चा न्यायचा कुठे?
संजय राऊत यांचा राज्यकर्त्यांना सवाल
मुंबई: प्रतिनिधी
मराठी माणसाला मराठीसाठी मोर्चा काढण्यास महाराष्ट्रातच बंदी घातली जाणार असेल तर हा मोर्चा न्यायचा कुठे, असा सवाल शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्यकर्त्यांना उद्देशून केला आहे. तुमच्यासारख्या सत्ताधाऱ्यांना खुर्चीवरून खाली खेचून हुतात्मा चौकात आणलं पाहिजे, असेही राऊत म्हणाले.
मीरा भाईंदर येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना ठाकरे गट यांनी आयोजित केलेल्या मोर्चाला परवानगी नाकारण्याच्या पोलिसांच्या निर्णयावर राऊत यांनी तीव्र संताप व्यक्त केला.
या राज्यात मराठी मुख्यमंत्रीच आहे ना, असा सवाल करून राऊत म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर मुंबई प्रांताचे माजी मुख्यमंत्री मोरारजी देसाई यांचे भूत तर सवार झालेले नाही ना? महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी मोरारजींनी गोळीबार करून 106 हुतात्मे केले. सध्याचे राज्यकर्ते त्यांचाही विक्रम मोडीत काढतील असे वाटत आहे, असेही ते म्हणाले.
मीरा-भाईंदर मध्ये सर्व राजकीय पक्ष आपापले झेंडे बाजूला ठेवून मोर्चा काढण्यासाठी एकवटले असताना पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली. मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्यासह मनसे आणि ठाकरे गटाच्या अनेक नेत्यांची पहाटेपासून धरपकड केली. अनेकांना नोटिस बजावल्या, असे राऊत यांनी सांगितले.
खासदार निशिकांत दुबे यांनी महाराष्ट्र बाबत अत्यंत घाणेरडे विधान केले. हे खासदार दुबे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांचे निकटवर्ती आहेत. महाराष्ट्राला पटकू न पटकून आपटणे हे उद्योगपतींची दलाली करून कमिशन खाण्याएवढे आणि मोदी शहांचे बूट चाटण्याएवढे सोपे नाही. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे, असेही राऊत म्हणाले.
निशिकांत दुबे हा माणूस दिल्ली विद्यापीठाची बोगस पदवी घेऊन संसदेत बसला आहे. तो आम्हाला, महाराष्ट्राला शिकवत आहे आणि आमचे मुख्यमंत्री, मंत्रिमंडळ तोंडात बोळे कोंबून बसले आहे, अशी टीकाही राऊत यांनी केली.