- राज्य
- '... म्हणून नाकारली मनसेच्या मोर्चाला परवानगी'
'... म्हणून नाकारली मनसेच्या मोर्चाला परवानगी'
खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच दिले स्पष्टीकरण
मुंबई: प्रतिनिधी
व्यापाऱ्यांनी 3 जुलै रोजी काढलेल्या मोर्चाला प्रतिउत्तर म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या मार्गावरून मोर्चा आयोजित केला होता त्या मार्गावर संघर्ष अटळ असल्याने त्यांना मार्ग बदलण्याची सूचना करण्यात आली. त्यांनी ती मान्य न केल्यामुळे मनसेच्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली, असे स्पष्टीकरण खुद्द मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलताना दिले.
मराठीच्या मुद्द्यावरून व्यापाऱ्याला झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ मीरा-भाईंदर येथील व्यापारी संघटनेने 3 जुलै रोजी मोर्चा काढला होता. या मोर्चाला प्रतिउत्तर म्हणून आज मनसेने मीरा-भाईंदर मध्ये मोर्चाचे आयोजन केले आहे. या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. तरीदेखील मोर्चा काढण्यावर मनसे ठाम असल्यामुळे मीरा भाईंदर मध्ये तणावाचे वातावरण आहे.
महाराष्ट्रात गुजराती मारवाडी व्यापाऱ्यांना मोर्चाला परवानगी मिळते आणि मराठी माणसांनी मराठीसाठी गाडलेल्या मोर्चाला परवानगी मिळत नाही हा कोणता न्याय, असा सवाल मनसे नेत्यांकडून केला जात आहे. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, मनसेने ज्या मार्गावरून मोर्चा काढण्यासाठी परवानगी मागितली होती त्या मार्गावर संघर्ष होणे अटळ होते. त्यामुळे त्यांना मार्ग बदलण्यास सांगण्यात आले. ते त्यांनी मान्य केले नाही. आम्हाला हवे त्याच मार्गावरून मोर्चा काढू, असे चालणार नाही, या शब्दात मुख्यमंत्र्यांनी मनसेला खडसावले आहे.