- राज्य
- मनसेच्या मोर्चाआधीच व्यापाऱ्यांचा माफीनामा
मनसेच्या मोर्चाआधीच व्यापाऱ्यांचा माफीनामा
पोलिस उपायुक्तांना सादर केले पत्र
मीरा-भाईंदर: प्रतिनिधी
एकीकडे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारल्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले असतानाच मोर्चापूर्वीच व्यापाऱ्यांच्या संघटनेने माफीनामा सादर केला आहे. व्यापाऱ्यांनी काढलेल्या मोर्चा मध्ये कोणाच्याही भावना दुखावण्याचा उद्देश नव्हता, असे संघटनेने पोलीस उपायुक्तांना सादर केलेल्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.
मराठीच्या मुद्द्यावरून व्यापाऱ्याला झालेल्या मारहाणीनंतर व्यापारी संघटनेने 3 जुलै रोजी मोर्चा काढला होता. या मोर्चाला प्रतिउत्तर म्हणून आज मनसेने मोर्चाचे आयोजन केले आहे. मात्र, पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली आहे. मोर्चाचे आयोजक अविनाश जाधव यांना पहाटे तीन वाजता पोलिसांनी ताब्यात घेतले. संदीप देशपांडे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांना नोटिसावा जेवणात आले असून अनेक मनसैनिकांची धरपकड करण्यात आली आहे.
महाराष्ट्रात गुजराती व्यापाऱ्यांच्या मोर्चाला परवानगी दिली जाते मात्र मराठी माणसांनी मराठीसाठी काढलेल्या मोर्चाला परवानगी नाकारली जाते. हा कुठला न्याय, असा सवाल मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी केला आहे. पोलिसांनी परवानगी नाकारली तरीही मोर्चा काढण्यावर मनसे ठाम आहे. त्यामुळे शहरात तणावाचे वातावरण आहे.
दरम्यान, व्यापारी संघटनेने तीन जुलै च्या मोर्चाबद्दल पोलीस उपायक्त प्रकाश गायकवाड यांना पत्र सादर केले आहे. आपला मोर्चा कोणत्याही समाज घटका विरोधात, भाषिक घटकाविरोधात अथवा पक्ष विरोधात नव्हता. कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू या मोर्चा मागे नव्हता. व्यापाऱ्याला झालेल्या मारहाण व शिवीगाडीमुळे व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. ते कमी व्हावे, एवढाच त्यामागे हेतू होता. तरीदेखील यामुळे कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील, तर आम्ही माफी मागतो, असे त्या पत्रात नमूद करण्यात आले आहे.