- राज्य
- 'खेळाडूंच्या यशात फिजिओथेरेपीस्टचे योगदान महत्त्वाचे'
'खेळाडूंच्या यशात फिजिओथेरेपीस्टचे योगदान महत्त्वाचे'
अभिनव बिंद्रा यांच्या हस्ते संचेती रुग्णालयातील अत्याधुनिक फिजियोथेरेपी केंद्राचे उद्घाटन
पुणे: प्रतिनिधी
प्रत्येक खेळाडूच्या कामगिरी आणि यशात फिजिओथेरपीस्टचे योगदान महत्त्वपूर्ण असल्याचे भारताचे पहिले वैयक्तिक ऑलिंपिक सुवर्ण पदक विजेते खेळाडू अभिनव बिंद्रा यांनी सांगितले. बिंद्रा यांच्या हस्ते संचेती रुग्णालयातील अत्याधुनिक फिजियोथेरेपी उपचार व पुनर्वसन केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.
या कार्यक्रमाला संचेती रुग्णालयाचे अध्यक्ष के एच संचेती, डॉ पराग संचिती, बजाज ऑटोचे कार्यकारी संचालक राजीव बजाज, संचेती रुग्णालयाच्या कार्यकारी संचालिका मनीषा संघवी, फिजिओथेरपी विभागाच्या प्रमुख दर्शिता नरवाणी आदी मान्यवर उपस्थित होते.
फिजिओथेरपीस्ट हे खेळाडूसाठी केवळ शारीरिक कमतरता दूर करतात असे नाही तर मानसिक स्वास्थ्य राखण्यातही त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान असते. आपल्या दोन दशकांच्या क्रीडा क्षेत्रातील कारकिर्दीत 10 फिजीओथेरपीस्टनी आपल्या कारकिर्दीला आकार देण्याचे कार्य केले आहे, असे बिंद्रा यांनी स्पष्ट केले. आधुनिक जीवनशैलीत शरीराच्या हालचालीवर मर्यादा येत असल्याबद्दल बिंद्रा यांनी चिंताही व्यक्त केली.
हे केंद्र राष्ट्रीय स्तरावरील विशेषतः क्रीडा क्षेत्रात मैलाचा दगड ठरेल. दुखापतग्रस्त खेळाडूंना विविध उपचार पद्धती आणि पुनर्वसन सुविधा एका छताखाली उपलब्ध करून देण्याचे कार्य या केंद्रामार्फत केले जाईल, असा दावा डॉ. पराग संचेती यांनी यावेळी केला. अभिनव बिंद्रा हे केवळ खेळाडू म्हणूनच नव्हे तर अभिनव बिंद्रा फाउंडेशनच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या समाजकार्यासाठी देखील दीर्घकाळ समाजाचे प्रेरणास्त्रोत राहतील, असेही डॉ संचेती यांनी नमूद केले.