- राज्य
- 'शेतकऱ्यांसाठी आर्थिक राजधानी एक दिवस बंद व्हावी'
'शेतकऱ्यांसाठी आर्थिक राजधानी एक दिवस बंद व्हावी'
बच्चू कडू यांचे राज ठाकरे यांना आवाहन
मुंबई: प्रतिनिधी
अनेकदा अनेक कारणांसाठी मुंबई बंद झाल्याचे आपण पाहिले आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या न्याय्य मागण्यासाठी एक दिवस तरी देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई बंद व्हावी, असे आवाहन प्रहार जनशक्ती संघटनेचे नेते बच्चू कडू यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांना केले आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सुरू असलेल्या यवतमाळ यात्रेत सहभागी होण्याचे निमंत्रण देखील कडू यांनी ठाकरे यांना दिले.
सध्या सरकारकडून शेतकऱ्यांची टिंगल केली जात आहे. दुष्काळ पडला तर कर्जमाफी देऊ, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सांगत आहेत. म्हणजे सरकार दुष्काळ पडण्याची वाट बघते आहे का, असा सवाल कडू यांनी ठाकरे यांच्या भेटीनंतर पत्रकारांशी बोलताना केला.
मागच्या दोन वर्षात शेतीमालाला भाव मिळालेला नाही. त्यामुळे आर्थिक अडचणीत असलेला शेतकरी आत्महत्या करत आहे. फडणवीस यांनी याकडे लक्ष दिले पाहिजे, अशी अपेक्षा कडू यांनी व्यक्त केली. राज ठाकरे यांच्याशी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक अथवा कोणत्याही राजकीय विषयावर नव्हे तर केवळ शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत आपल्याला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची साथ मिळावी, अशी आपली अपेक्षा आहे. स्थानिक स्वराज्य संस्था एकत्रित लढवण्याच्या दृष्टीने नव्हे तर मरणाऱ्या शेतकऱ्याला वाचविण्याच्या दृष्टीने ठाकरे यांच्याशी चर्चा झाल्याचे कडू यांनी सांगितले.
भाजप कार्यालयातच मारा शिक्के
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका मतदान यंत्राद्वारे घेणार असल्याबद्दल कडू यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. यंत्राद्वारे मतदान होत असताना आपण निवडणूक का लढवतो, असाच प्रश्न पडतो. मतदान यंत्र वापरून निवडणूक घेण्यापेक्षा भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयातच शिक्के मारून निवडणूक पार पाडावी, असा उपरोधिक टोला देखील कडू यांनी लगावला.