- राज्य
- 'अमित शहा यांची भेट ही सदिच्छा भेटच'
'अमित शहा यांची भेट ही सदिच्छा भेटच'
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा खुलासा
नवी दिल्ली: प्रतिनिधी
आपण गृहमंत्री अमित शहा यांची सर्व खासदारांसह भेट घेतली असून ही भेट सदिच्छा भेटच होती, असा खुलासा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. शिंदे यांच्या सतत होणाऱ्या दिल्ली वारीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
अमित शहा यांची आपली भेट झाली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेणार असल्याचे एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. मी जे काही करतो ते उघडपणे करतो. लपून-छपून काहीही करत नाही. मागच्या दिल्ली दौऱ्यामध्ये आपली आणि अमित शहा यांची भेट झालेली नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
आपल्या पक्षाच्या खासदारांचे काही विषय अमित शहा यांच्या कानावर घातली. महाराष्ट्रात केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने काही विकास प्रकल्प सुरू आहेत. त्याच्याबद्दलही या भेटीत चर्चा झाली, असा खुलासा देखील शिंदे यांनी केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिंदे यांच्यामध्ये काही प्रमाणात तणाव असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यामुळेच शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यात वाढ झाल्याचे सांगितले जाते. मात्र, शिंदे यांनी शहा यांची भेट ही सदिच्छा भेट असल्याचा दावा केला आहे.