आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागात भात खाचरांना तलावांचे स्वरूप
रांजणी / रमेश जाधव
आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागामध्ये मान्सून पूर्व वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने गेले काही दिवस थैमान घातल्यामुळे भातखाचरांना तलावांचे स्वरूप आले आहे . भातखाचरांचे बांध फुटून जनावरांच्या चाऱ्यासह हिरडा पिकाचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे . प्रशासनाने झालेल्या नुकसानीची तात्काळ दखल घेऊन पंचनामे करावेत अशी मागणी आदिवासी भागातील शेतकरी वर्गातून जोर धरत आहे .
दरम्यान तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील भीमाशंकर तसेच पाटण आणि आहुपे खोऱ्यामध्ये मागील दोन ते तीन दिवस - रात्र वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसामुळे भात खाचरांच्या बांधासह जनावरांच्या चाऱ्याचे आणि हिरडा पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले . रविवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास अवकाळी पावसाने मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले . रात्रभर पडलेल्या या पावसामुळे भात खाचरांचे बांध फुटून गेले आहेत .या भागामध्ये आदिवासी बांधवांचे उदरनिर्वाहाचे साधन म्हणून समजल्या जाणाऱ्या हिरडा पिकाचा उल्लेख होतो . मात्र हिरडा पिकाचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे . त्याचप्रमाणे आदिवासी बांधवांनी पुढील काळासाठी झाडावर जमिनीवर रचून ठेवलेले गवत , भाताचा पेंढा भिजून गेला आहे . हा चारा भिजून गेल्यानंतर काळा पडतो आणि जनावरांच्या खाण्यालायक देखील राहत नाही . अगदी काही दिवसांवर पावसाळा येऊन ठेपला असून अशी नैसर्गिक संकटे ओढवल्याने आदिवासी बांधव चिंतातुर झाला आहे . त्यामुळे बाधित क्षेत्राचे तात्काळ पंचनामे करण्यात यावेत आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना योग्य ती नुकसान भरपाई मंजूर करण्यात यावी अशी मागणी आदिवासी बांधवांनी केली आहे .
तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भीमाशंकर पाटण आणि आहुपे खोऱ्यात सातत्याने मान्सूनपूर्व मुसळधार पाऊस पडत असल्याने डिंभे धरणाच्या पाणी साठ्यात वाढ होऊ लागली आहे . त्यामुळे काही अंशी समाधानाचे वातावरण आहे . परंतु असे असले तरी मान्सूनपूर्व पावसाने आदिवासी भागातील शेत पिकांचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाल्याचे पाहायला मिळते . घटनेची माहिती मिळताच माजी सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील यांनी आंबेगाव आणि जुन्नरचे प्रांताधिकारी गोविंद शिंदे यांना तात्काळ नुकसानग्रस्त शेत पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश दिले .
माजी सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी देखील पश्चिम आदिवासी भागात मान्सूनपूर्व झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीची माहिती घेतली . त्यानुसार आदिवासी भागातील भीमाशंकर पाटण आणि आहुपे खोऱ्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसामध्ये आदिवासी बांधवांच्या भात शेतीच्या बांधांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले . त्या शेतीची प्रशासनाला पाहणी करून पंचनामे करण्याचे आदेश दिल्याचे वळसे पाटील यांनी सांगितले .
000