- राज्य
- ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डॉ शं.ना. नवलगुंदकर यांचे निधन
ज्येष्ठ शिक्षणतज्ञ डॉ शं.ना. नवलगुंदकर यांचे निधन
शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रावर शोककळा
पुणे : प्रतिनिधी
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे माजी प्र.कुलगुरू डॉ. शं. ना. नवलगुंदकर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले ते 89 वर्षांचे होते. रविवारी सकाळी ८:३० वाजता त्यांचे पार्थिव त्यांच्या घरी अंत्यदर्शनासाठी ठेवणार आहेत. अंत्यविधी १०.३० वाजता वैकुंठ स्मशानभूमी येथे होईल.
ते मॉडर्न महाविद्यालयाचे माजी प्राचार्य, पुणे विद्यापीठाचे माजी प्र कुलगुरू आणि रा.स्व.संघाचे पूर्व पुणे विभाग मा. संघचालक होते.
डॉ. शंकर नागेश नवलगुंदकर यांचा जन्म २७ सप्टेंबर, १९३५: रोजी संगमनेर येथे झाला. त्यांचे मूळ गाव संगमनेर असून त्यांचे वडील तेथे संस्कृतचे शिक्षक होते. त्यांचे शालेय शिक्षण संगमनेरच्या पेटिट हायस्कूलमध्ये आणि महाविद्यालयीन शिक्षण नाशिकच्या एचपीटी महाविद्यालयामध्ये झाले. महाविद्यालयातील प्राध्यापकांनी सुचवल्यामुळे संस्कृतऐवजी अर्थशास्त्र विषय घेऊन नवलगुंदकरांनी पदवी मिळवली. त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर या विषयावर पीएच.डी.ची पदवी मिळवली.
सन १९५८ च्या सुमारास नवलगुंदकर पुण्यात आले आणि सराफ विद्यालय (आत्ताचे भारत हायस्कूल) येथे इंग्लिश आणि गणिताचे शिक्षक म्हणून रुजू झाले. त्यानंतर शाहू महाविद्यालय, गरवारे महाविद्यालय, मॉडर्न महाविद्यालय आणि पुणे विद्यापीठात त्यांनी अध्यापन केले. पुणे विद्यापीठाचे प्र कुलगुरू झाल्यावरही ते टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ आणि पुणे विद्यापीठात अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र हे विषय शिकवीत. नवलगुंदकर २०१६पासून संगमनेरच्या शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष होते.
सन१९८० ते १९९० या कालावधीत विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य , विद्यापीठाच्या राजकारणातील प्रभावी व्यक्तिमत्व म्हणून डॉ. नवलगुंदकर यांचा परिचय होता . महाराष्ट्रातील एक प्रभावी वक्ता म्हणूनही डॉ. नवलगुंदकर यांचा परिचय होता त्यांनी अखिल भारतीय विद्यार्थी परिषद पुणे शाखेचे उपाध्यक्ष म्हणून काही काळ कार्यरत होते. त्याचप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पुणे पूर्व विभागाचे संघचालक म्हणून देखील त्यांनी काम पाहिले. कर्वे रस्त्यावर उभारण्यात आलेल्या सावरकर स्मारकाच्या उभारणीसाठी डॉ नवलगुंदकर यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरले.