- राज्य
- '...मराठीची तळमळ तर उद्धव यांच्या भाषणात सत्तेची मळमळ'
'...मराठीची तळमळ तर उद्धव यांच्या भाषणात सत्तेची मळमळ'
विजय मेळाव्यातील भाषणांवर एकनाथ शिंदे यांची तिखट प्रतिक्रिया
मुंबई: प्रतिनिधी
मराठी विजय मेळाव्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या भाषणात मराठी बद्दलची तळमळ दिसून आली तर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भाषणात सत्तेसाठीची मळमळ दिसून आली, अशी तिखट प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. उद्धव ठाकरे यांच्या भाषणामुळे मराठी माणसाचा अपेक्षाभंग झाला आहे, असेही ते म्हणाले.
आजचा मेळावा मराठी माणसासाठी असल्याचे सांगितले गेले. मात्र, उद्धव ठाकरे यांच्या भाषणात केवळ जळजळ, मळमळ आणि द्वेष होता, अशी टीका करून शिंदे यांनी, मराठी माणूस वसई विरार नालासोपारा, बदलापूर, अंबरनाथ, वांगणी इथपर्यंत बाहेर का फेकला गेला, असा सवालही केला.
उद्धव ठाकरे सातत्याने माझ्यावर टीका करतात. मात्र, मी त्यांना तसेच उत्तर देत नाही. मी माझे उत्तर माझ्या कामातून देतो. त्यामुळेच मी मुख्यमंत्री झालो. त्यानंतर झालेल्या निवडणुकीतही आम्हाला भरघोस यश मिळाले, असेही शिंदे म्हणाले.
आम्ही मराठीला अभिजात दर्जा प्राप्त करून दिला. आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे त्यासाठी पाठपुरावा केला. त्यांनी आमची मागणी लगेच मान्य करून मराठीला अभिजात दर्जा दिला. त्यांनाही उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात सोडले नाही, हे दुर्दैवी आहे, असेही शिंदे म्हणाले.