- राज्य
- "... तेव्हा कुठे होते तुमचे योद्धे?'
"... तेव्हा कुठे होते तुमचे योद्धे?'
मार्कोस कमांडोचा राज ठाकरे यांना सवाल
मुंबई: प्रतिनिधी
मी उत्तर प्रदेशचा आहे. मी महाराष्ट्रासाठी रक्त सांडले आहे. २६/११ चा दहशतवादी हल्ला झाला त्यावेळी कुठे होते तुमचे योद्धे, असा सवाल ताज हॉटेलवरील कारवाई सहभागी झालेले मार्कोस कमांडो प्रवीण कुमार तेवतिया यांनी केला आहे. त्याचप्रमाणे भाषेच्या आधारावर देशाचे विभाजन करू नका, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
राज्यात मागील काही काळापासून हिंदी भाषेच्या सक्तीवरून वातावरण तापलेले आहे. याच मुद्द्यावर तब्बल वीस वर्षानंतर शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे एका मंचावर आले. हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेण्यात आल्याबद्दल त्यांनी विजयी मेळावा आयोजित केला.
प्रवीण कुमार यांनी समाज माध्यमांवर एक पोस्ट प्रसिद्ध केली आहे. त्यात त्यांचे कमांडोच्या वेशातील हातात रायफल घेतलेले छायाचित्र आहे. बुलेटप्रूफ जॅकेटवर युपी असे लिहिले आहे. याच पोस्टमध्ये प्रवीण कुमार यांनी राज ठाकरे यांना बोचरा सवाल केला आहे. त्याचप्रमाणे हास्याला भाषा नसते, असे विधानही केले आहे.
ताज हॉटेलवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मरीन कमांडो फोर्स अर्थात मार्कोसच्या पथकाने तब्बल दीडशे जणांचे प्राण वाचवले. या पथकाचे नेतृत्व प्रवीण कुमार यांनी केले. या कारवाईत त्यांना अनेक जखमा झाल्या आणि चार गोळ्याही लागल्या. या पथकाच्या कारवाईमुळे हॉटेलमध्ये अडकलेल्या अनेक जणांची सुरक्षित सुटका झाली.