- राज्य
- कॅनव्हासवर उमटली देवी अहिल्यांची शिवभक्ती
कॅनव्हासवर उमटली देवी अहिल्यांची शिवभक्ती
शंभर वर्षांपूर्वीच्या महाकुंभाच्या वैभवाचे दर्शन आलेख्य चित्रप्रदर्शनात
दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूर (संस्कृती मंत्रालय, भारत सरकार) आयोजित सहा दिवसीय "आलेख्य" चित्रप्रदर्शनाचे बालगंधर्व कलादालन येथे उद्घाटन
पुणे: प्रतिनिधी
दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूर (संस्कृती मंत्रालय, भारत सरकार) यांच्या वतीने पुण्यातील बाल गंधर्व कला दालनात सहा दिवसीय "आलेख्य" चित्रप्रदर्शनाचे उद्घाटन झाले. हे प्रदर्शन २२ सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे.
हे प्रदर्शन पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जन्म त्रिशताब्दी वर्षानिमित्त आणि महाकुंभाच्या वैभवाला अर्पण करण्यात आले आहे. देशभरातील विविध कलाकारांच्या कलाकृतींमधून भारतीय संस्कृती, परंपरा आणि इतिहास यांचे अप्रतिम दर्शन घडवण्यात आले आहे.
उद्घाटन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून मंत्री आयसीसीआर सब सेंटर पुणेचे संचालक सुदर्शन शेट्टी तसेच दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राचे सहाय्यक संचालक (कार्यक्रम) दीपक कुलकर्णी, ज्येष्ठ नाट्य कलावंत सतीश इंदापूरकर उपस्थित होते. देशभरातून सुमारे २०० कलाकारांच्या कलाकृतींपैकी ५३ चित्रांची निवड करून या प्रदर्शनात प्रदर्शित करण्यात आली आहे. दोन्ही विषयांवरील चित्रांमध्ये भारतीय इतिहास, संस्कृती आणि परंपरेचे दर्शन घडते.
दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र, नागपूरच्या संचालिका आस्था कार्लेकर यांनी सांगितले की कलाकारांनी देवी अहिल्याबाईंची शिवभक्तीपासून स्त्रीशिक्षणासाठी केलेल्या प्रयत्नांपर्यंतची सारी मांडणी कॅनव्हासवर साकारली आहे. ही सर्व चित्रे रायपूर येथे संस्कार भारती यांच्या सहकार्याने आयोजित कार्यशाळेत साकारण्यात आली. एका चित्रात अहिल्याबाई माहेश्वरी साड्यांच्या हॅन्डलूमसह दाखवण्यात आल्या आहेत. एका चित्रात सतीप्रथेचा विरोध दिसतो, तर दुसऱ्या चित्रात त्या घाटावर शिवलिंग हातात घेतलेले दिसतात.
महाकुंभासाठी उभारण्यात आलेल्या कलाग्रामात अनेक कलाकारांनी विविध कलाकृती साकारल्या आहेत. साधना करणाऱ्या साधूंपासून ते महाकुंभाच्या प्रचंड गर्दीपर्यंत प्रत्येक दृश्य विविध कलाकारांनी कॅनव्हासवर साकारले आहे. या चित्रांकडे पाहताना जणू प्रेक्षक प्रत्यक्ष कुंभनगरी प्रयागराजला पोहोचल्याचा भास होतो.
या प्रदर्शनाला कला रसिक, विद्यार्थी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून भरभरून प्रतिसाद दिला. कला वीथिकेत प्रेक्षकांची उत्साहपूर्ण उपस्थिती होती. चित्रांच्या माध्यमातून प्रेक्षकांनी पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे त्याग, सेवा आणि जनकल्याणकारी कार्य तसेच महाकुंभाची अद्वितीय सांस्कृतिक आणि आध्यात्मिक छटा अनुभवली.