- राज्य
- केजरीवाल यांना अटक, अण्णा हजारे आहेत कुठे?
केजरीवाल यांना अटक, अण्णा हजारे आहेत कुठे?
शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांचा सवाल
मुंबई प्रतिनिधी
दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय निमंत्रण अरविंद केजरीवाल यांना बेकायदेशीर रित्या अटक करण्यात आलेली असताना भ्रष्टाचारा विरोधात आंदोलन करणारे अण्णा हजारे आहेत कुठे, असा सवाल शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी भ्रष्टाचाराच्या विरोधात देशव्यापी आंदोलन केले. त्यावेळी केजरीवाल त्यांच्याबरोबर होते. पुढे त्यांनी मोठा राजकीय पक्ष स्थापन केला. दिल्ली आणि पंजाब सारख्या राज्यात त्यांची सत्ता आहे. त्यांचा पक्ष देशभर विस्तारलेला आहे. राजकीय सूड उगवण्याच्या उद्देशाने त्यांना अटक करण्यात आली आहे, असा आरोप राऊत यांनी केला.
ज्या अबकारी कर प्रकरणात त्यांना अटक करण्यात आली ते भ्रष्टाचाराचे प्रकरण केवळ कागदावरचे आहे. तरीही विरोधक संपविण्याच्या दृष्टीने ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांना अटक करण्यात आली. ही अटक बेकायदेशीर आहे. हा भ्रष्टाचार होत असताना भ्रष्टाचाराच्या विरोधात आंदोलन करणारे अण्णा हजारे आहेत कुठे? त्यांना जागे करण्याची आवश्यकता आहे, असे संजय राऊत म्हणाले.
विरोधकांना गजाआड करण्याचा सपाटा
भारतीय जनता पक्षाला आगामी लोकसभा निवडणुकीत पराभूत होण्याची भीती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या जुलमी कारभाराविरोधात उठाव होण्याची भीती आहे. त्यामुळे अमित शहा आणि मोदी यांना ज्या नेत्यांपासून धोका वाटतो अशा नेत्यांना गजाआड करण्याचा सपाटा सरकारने लावला आहे, असा आरोप करतानाच, यापुढे आणखीही काही नेत्यांना अटक होऊ शकते, अशी शक्यता ही राऊत यांनी व्यक्त केली आहे.
भाजपाचा हजारो कोटींचा भ्रष्टाचार
तत्त्वनिष्ठेचे गोडवे जाणाऱ्या भाजपने हजारो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचे उघड झाले आहे. भाजपाने आपल्या कार्यकाळात सत्तेचा गैरवापर करून दहशत निर्माण करून खंडणी आणि हप्त्यांच्या माध्यमातून हजारो कोटी रुपये जमा केले आहेत, असा गंभीर आरोप राऊत यांनी केला आहे.