कबुतरखान्यांवरील बंदी कायम, जनतेची भूमिका जाणून घेण्याचे आदेश
उच्च न्यायालयात चार आठवड्यांनी पुढील सुनावणी
मुंबई: प्रतिनिधी
कबुतरखान्यांवरील बंदी तूर्तास उच्च न्यायालयाने कायम ठेवली आहे. मुंबई महापालिकेने नोटीस जारी करून जनतेची भूमिका जाणून घ्यावी आणि त्यानुसार कारवाई करावी, असे आदेश न्यायालयाने महापालिकेला दिले आहेत. चार आठवड्यानंतर मुंबई उच्च न्यायालयात याविषयी पुन्हा सुनावणी होणार आहे.
कबुतरखान्यांवरील बंदीबाबत मुंबई महापालिकेने आणि राज्य सरकारने आपले म्हणणे न्यायालयात मांडले. मानवी आरोग्याला हानी पोहोचणार नाही अशा पद्धतीने कबुतरांना नियंत्रित प्रमाणात खाद्य देण्याची तयारी राज्य शासनाने दाखवली तर रेसकोर्ससारख्या मोकळ्या जागी संध्याकाळी सहा ते आठ या मर्यादित वेळेत कबुतरांना खाद्य देण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी मुंबई महापालिकेने न्यायालयाकडे. मात्र, न्यायालयाने ती तूर्तास मान्य केलेली नाही. जनतेची भूमिका लक्षात घेऊन महापालिकेने निर्णय घ्यावा, असे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. चार आठवड्यानंतर या प्रकरणी पुन्हा सुनावणी घेण्यात येणार आहे.