- राज्य
- 'मराठा आणि मुस्लिम समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न'
'मराठा आणि मुस्लिम समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न'
'खालीद का शिवाजी' या चित्रपटाच्या टीझरवरून नरेंद्र पाटील यांचा आरोप
सातारा: प्रतिनिधी
'खालिद का शिवाजी' या चित्रपटाच्या टिझरच्या माध्यमातून मराठा आणि मुस्लिम समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केला आहे.
हा चित्रपट गणेशोत्सवापूर्वी प्रदर्शित करण्याचा आणि त्या काळात मराठा आणि मुस्लिम समाजात तेढ निर्माण करून भांडणे लावण्याचा प्रयत्न होता. मात्र, आमच्या विनंतीची दखल घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या चित्रपटाच्या प्रदर्शनाला एक महिन्यासाठी स्थगिती दिली आहे. दोन समाजांमध्ये विधिष्ठ निर्माण करण्याचा डाव आखणाऱ्यांच्या मुळाशी मुख्यमंत्री निश्चितपणे जातील, असा विश्वास देखील पाटील यांनी व्यक्त केला.
या चित्रपटाच्या निर्मितीचा नेमका उद्देश काय, त्याच्या मागे नेमके कोण कोण आहे, याची चौकशी गृहविभागाने विशेष पथकाची नेमणूक करून केली पाहिजे, अशी अपेक्षादेखील पाटील यांनी व्यक्त केली.
‘खालिद का शिवाजी’ या चित्रपटाचे दिग्दर्शन राज प्रितम मोरे यांनी केले आहे. या चित्रपटात प्रियदर्शन जाधव, भरत गणेशपुरे, सुषमा देशपांडे, कैलास वाघमारे, स्नेहलता तागडे हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. आता या सिनेमाच्या प्रदर्शनावर एक महिन्याची स्थगिती देण्यात आली आहे.