- राज्य
- आंबेडकरी चळवळीचे नियोजित ठिय्या आंदोलन 15 ऑगस्ट रोजी
आंबेडकरी चळवळीचे नियोजित ठिय्या आंदोलन 15 ऑगस्ट रोजी
स्थगिती निर्णयाबद्दल आभार परंतु स्मारकाची घोषणा होत नाही तोपर्यंत आंदोलन कायम
पुणे : प्रतिनिधी
मंगळवार पेठ येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन च्या शेजारील राज्य शासनाच्या एमएसआरडीसीच्या जागेवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे राष्ट्रीय स्मारक उभे करावी यासाठी पुणे शहरातील आंबेडकरी चळवळीच्या वतीने गेल्या काही वर्षांपासून मोठे आंदोलन उभे करण्यात आलेले आहे, याच आंदोलनाचा भाग म्हणून येत्या 15 ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता हजारो लोकांच्या उपस्थितीमध्ये लाक्षणिक ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. अशी माहिती डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन विस्तार कृती समितीच्या वतीने देण्यात आली.
समितीच्या वतीने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हंटले आहे की, रस्ते विकास महामंडळाची जागा स्मारकाला मिळावी यासाठी सुमारे वीस वर्षापासून आंबेडकरी चळवळ प्रयत्न करत आहे. राज्य सरकारने ही जागा खाजगी विकसकाला 60 वर्षाच्या भाडे करारावर दिल्यामुळे आंबेडकरी जनतेमध्ये तीव्र नाराजगी निर्माण झाली होती. त्याचा परिणाम म्हणून या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे राष्ट्रीय स्मारक व्हावी म्हणून आंबेडकरी चळवळी कडून आंदोलने करण्यात येत आहे, 15 ऑगस्ट रोजी होणाऱ्या आंदोलनासंदर्भामध्ये आतापर्यंत शहरांमध्ये शंभर पेक्षा अधिक ठिकाणी विविध बैठका झाल्या आहेत, या ठिय्या आंदोलनाला मुस्लिम, मातंग, मेहतर व इतर समाज बांधवांकडून देखील पाठिंबा प्राप्त झालेला असून त्यांचे प्रतिनिधी या आंदोलनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी होणार आहेत.
पुण्याचे पोलीस आयुक्त यांच्याबरोबर झालेल्या चर्चेनंतर सकारात्मक वातावरण निर्माण व्हावी म्हणून त्यांनी राज्य सरकारशी संपर्क साधून सदर जागेवर विकसकाकडून करण्यात येणाऱ्या कामाला स्थगिती देण्याबाबतचे आदेश प्राप्त करून समितीकडे दिलेले आहेत. राज्य शासनाच्या या भूमिकेचे समितीच्या वतीने स्वागत करण्यात आले असून हे अत्यंत सकारात्मक पाऊल असली तरी आंबेडकरी जनता ही स्मारकाची वाट पाहत आहे त्यामुळे स्मारकाची घोषणा होत नाही तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही असा एकमुखी निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला व त्यानुसारच 15 ऑगस्ट रोजी चे नियोजित आंदोलन हे अधिक मोठ्या प्रमाणात परंतु शांततेत होईल असा विश्वास या बैठकीत सर्वच पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
सदर प्रसिद्धी पत्राद्वारे राज्यातील व शहरातील आंबेडकरी जनतेला आव्हान करण्यात येत आहे की समितीच्या वतीने पुकारण्यात आलेल्या आंदोलनात सहभागी होत असताना खालील प्रमाणे आचारसंहिता निश्चित करण्यात आली असून त्याचे पालन करत या आंदोलनामध्ये शांततेने सहभागी व्हावे व आपला स्मारकाचा दीर्घकाळ सुरू असलेला लढा अधिक बळकट करण्यासाठी प्रयत्न करावा व या आंदोलनामुळे कोणत्याही प्रकारची कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण होणार नाही याबाबत प्रत्येक सहभागी आंदोलकांनी सजग राहावे असेही आवाहन यावेळी करण्यात आले.
दरम्यान आंदोलन हे केवळ स्मारकाच्या निर्मितीसाठी असल्यामुळे या आंदोलनाला पहिल्यापासूनच कोणताही राजकीय रंग देण्यात आलेला नाही व तो यापुढेही देण्याचा कोणताही मनोदय नसल्याचा स्पष्ट निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात आला परंतु काहीही झालं तरी विद्यमान सरकारने शक्य तितक्या लवकर शक्यतो १५ ऑगस्ट पूर्वीच स्मारक निर्मितीची घोषणा करून आंदोलनापासून समाजाला परवृत्त करावे अशी देखील अपेक्षा समितीने व्यक्त केली आहे.
*आंदोलनात सहभागी होताना खालील सूचनांचे पालन करावे*
- आंदोलनात कोणीही कोणत्याही प्रकारच्या घोषणा देणार नाही.
- आंदोलनात केवळ भारतीय तिरंगा राष्ट्रध्वज व अशोक चक्रांकी निळा ध्वज घेऊन सहभागी व्हायचे आहे.
- या आंदोलनात कोणत्याही प्रकारची सभा व भाषणे होणार नाही याची नोंद घ्यावी
- या आंदोलनात सहभागी कार्यकर्त्यांकडून कोणत्याही प्रकारचे गैरवर्तन पोलिसांशी व अन्य कार्यकर्त्यांशी हुज्जत घालण्याचे प्रकार सहन केले जाणार नाहीत अशा व्यक्तींवर तात्काळ कारवाई केली जाईल.
- आंदोलनात कोणत्याही धार्मिक प्रतीकांचा महापुरुषांच्या फोटोंचा व धार्मिक झेंड्यांचा वापर करू नये.
- आंदोलन सहभागी होणाऱ्या कुटुंबीयांनी आपली लहान मुले, मौल्यवान बाग दागिने यांची काळजी घ्यावी
- संपूर्ण आंदोलनावर सीसीटीव्ही व ड्रोन द्वारे नजर असेल.