- देश-विदेश
- विरोधी विचारसरणीच्या लोकांकडून राहुल गांधी यांच्या जीवाला धोका
विरोधी विचारसरणीच्या लोकांकडून राहुल गांधी यांच्या जीवाला धोका
वकील मिलिंद पवार यांचा पुण्यातील न्यायालयात अर्ज
पुणे : प्रतिनिधी
विनायक सावरकर यांच्या असंवैधानिक विचारसरणीने प्रेरित आणि नथुराम व गोपाळ गोडसे यांच्या धोकादायक मानसिकतेसारखी मानसिकता असलेले काही लोक राहुल गांधी यांच्या जीवाला धोका निर्माण करू शकतात, अशी भीती अॅड. पवार राहुल गांधी यांच्या वतीने पुण्यातील न्यायालयात दाखल केलेल्या अर्जामध्ये व्यक्त केली आहे,
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याविरोधातील मानहानीच्या खटल्याची सुनावणी पुण्यातील प्रथम श्रेणी विशेष न्यायाधीश अमोल शिंदे यांच्या न्यायालयात सुरू आहे.
राहुल गांधी यांचे वकील अॅड. मिलिंद दत्तात्रय पवार यांनी न्यायालयात अर्ज दाखल करून सांगितले की, राहुल गांधी यांनी अलीकडेच नवी दिल्ली येथे पत्रकार परिषद घेऊन निवडणूक आयोगाने केलेल्या मतदार फसवणुकीचे पुरावे देशासमोर ठेवले. तसेच संसद परिसरात “मत चोर सरकार” अशा घोषणा देत आंदोलन केले. याशिवाय हिंदुत्वाच्या विषयावर संसदेतील चर्चेदरम्यान पंतप्रधान आणि राहुल गांधी यांच्यात तीव्र शब्दयुद्ध झाले, ही बाब सर्वश्रुत आहे.
या पार्श्वभूमीवर फिर्यादी, त्यांचे पणजोबा (गोडसे), विनायक सावरकर यांच्या विचारसरणीशी संबंधित व्यक्ती आणि सध्या सत्तेत असलेले सावरकर अनुयायी हे राहुल गांधी यांच्याविषयी वैरभाव बाळगू शकतात, अशी शक्यता असल्याचे अर्जात नमूद आहे.
या खटल्यातील फिर्यादी सत्यकी सावरकर यांनी २९ जुलै २०२५ रोजी न्यायालयात दाखल केलेल्या लेखी निवेदनानुसार ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या हत्येचे मुख्य आरोपी नथुराम गोडसे आणि गोपाळ गोडसे यांचे पणतू आहेत.
पूर्वी भाजप खासदार मारवाह यांनी “राहुल गांधी यांचा शेवट त्यांच्या आजी इंदिरा गांधींसारखा होईल,” असे विधान केले होते, तर खासदार बित्तू सिंह यांनी “राहुल गांधी हे दहशतवादी आहेत” असे म्हटले होते.
या प्रकरणात राहुल गांधी यांना सध्या न्यायालयाने जामीन दिला असून, खटला पुराव्याच्या टप्प्यात आहे. त्यामुळे खबरदारी म्हणून हा गंभीर मुद्दा अधिकृतरीत्या न्यायालयाच्या निदर्शनास आणण्यात आला आहे. न्यायालयाने राहुल गांधी यांचा अर्ज नोंदवून ठेवला असून, पुढील सुनावणी १० सप्टेंबर २०२५ रोजी होणार आहे.