आंबेडकर भवनशेजारील जमीन बिल्डरला देण्याचा निर्णय रद्द
कृती समितीने मानले शासनाचे आभार
पुणे: प्रतिनिधी
मंगळवार पेठ येथील डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन शेजारील जागा आंबेडकर भवनांच्या विस्तारीकरणासाठी मिळावी अशी आंबेडकरी चळवळीची मागणी होती. मात्र ही जागा एका खासगी बिल्डरला देण्याचा निर्णय घेतला गेला होता. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आंबेडकरी समाजाच्या तीव्र भावना लक्षात घेऊन बिल्डरला जागा देण्याचा निर्णय अखेर रद्द केला आहे. डॉ बाबासाहेब आंबेडकर भवन विस्तार कृती समितीच्या वतीने या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त करण्यात आला असून शासनाचे आभार मानले आहेत.
“राज्य शासनाने आंबेडकरी जनभावनेची व आंदोलनाची दखल घेऊन नियोजित स्मारकाच्या जागेतील खासगी विकसकाच्या कामाला स्थगिती दिल्याबद्दल शासनाचे , मुख्यमंत्र्यांचे आम्ही आभार मानत आहोत. तसेच हा विजय आंबेडकरी पक्ष संघटनांच्या एकजुटीचा व सामाजिक संघटनांच्या आंदोलनाच्या दबावामुळे झाल्यामुळे सर्व आंदोलकांचे सुद्धा आभार व्यक्त करतो.”
शैलेंद्र चव्हाण , आंदोलनाचे निमंत्रक
—————————-
“आंबेडकरी आंदोलकांनी २५ वर्षांपासुन सातत्यपूर्ण केलेली लढाई व चळवळीतील दोन पीढ्यांचा हा विजय असून शासनाने शक्य तितक्या लवकर या ठिकाणी बाबासाहेबांचे स्मारक उभे करावी अशी भावना आंबेडकरी जनतेमध्ये आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच केंद्रीय नागरी उड्डयण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांचे तसेच पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांचेही आभार व्यक्त करीत आहोत. आमच्यासाठी हा आनंदाचा क्षण आहे.
राहुल डंबाळे , आंदोलनाचे समन्वयक
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे पुण्यात भव्य स्मारक व्हावे ही आंबेडकरी समाजाची मागणी होती. त्यासाठीचा ठराव पुणे महापालिकेने मंजूर केलेला असताना सदरची जमीन खासगी बिल्डरला देण्यात आली होती, कृती समितीने मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांकडे या बाबत पाठपुरावा केला होता, येत्या १५ ऑगस्ट रोजी ५० ते ६० हजार लोक ठिय्या आंदोलन करणार होते, त्याची जोरदार तयारी सुरू होती, आंबेडकरी समाजाच्या तीव्र भावना लक्षात घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासगी बिल्डरला जमीन देण्याचा निर्णय रद्द केला याबद्दल समिती त्यांची आभारी आहे, आता लवकरात लवकर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे भव्य स्मारक या जागेवर उभारावे ही शासनाला विनंती.
- परशुराम वाडेकर, आंदोलनाचे समन्वयक
आंबेडकरी चळवळीने दिलेल्या लढ्याला यश आले असून, महामंडळाने दिलेल्या स्थगितीच्या निर्णयाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन विस्तारीकरण समितीच्या वतीने स्वागत करतो. आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यासाठी आजचा दिवस आनंदाचा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यासह या लढ्यामध्ये साथ दिलेल्या सर्वच लोकप्रतिनिधींचे मनःपूर्वक आभार मानतो. हा आंबेडकरी जनतेचा अस्मितेचा विषय आहे. त्यामुळे केवळ स्थगिती न देता हा करार रद्द करावा, यासाठी आमचा लढा सुरू राहील.
एड. अविनाश साळवे