'जनक शोधांचे' हे पुस्तक प्रत्येक शाळा आणि कॉलेजमध्ये पोहचले पाहिजे

उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अतिरिक्त सचिव वेणूगोपाल रेड्डी यांचे मत

'जनक शोधांचे' हे पुस्तक प्रत्येक शाळा आणि कॉलेजमध्ये पोहचले पाहिजे

पुणे : प्रतिनिधी

डॉ. जयंत खंदारे करत असलेले संशोधन अतिशय मोलाचे आहे, त्यांना कर्करोगावरील संशोधनसाठी जागतिक पातळीवर नावाजले जाईल यात शंका नाही. डॉ.  खंदारे यांचे कार्य पाथब्रेकीग आहे,  त्यांनी लिहिलेले 'जनक शोधांचे' हे पुस्तक अत्यंत महत्वाचे आहे, हे पुस्तक जास्तीतजास्त शाळा, कॉलेजपर्यंत पोहोचले पाहिजे, असे मत राज्यच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे अतिरिक्त सचिव वेणूगोपाल रेड्डी यांनी व्यक्त केले. 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संत नामदेव सभागृहात डॉ. जयंत खंदारे लिखित 'जनक शोधांचे' या पुस्तकाच्या प्रकाशन वेळी ते बोलत होते. या प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी डॉ. विश्वनाथ कराड (संस्थापक एमआयटी विश्वशांती विद्यापीठ) होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. हर्षदीप कांबळे (प्रधान सचिव, सामानिक न्याय व विशेष सहाय्य मंत्रालय), डॉ. हिरवानी, डॉ. सुरेश गोसावी (कुलगुरु, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे), गणेश शिंदे, विद्यापीठाच्या संरक्षण विभागाचे विभाग प्रमुख  डॉ. विजय खरे, शशिकांत कांबळे (स्वान रिसर्च अँड सोशल स्टडी फाऊंडेशन) आदि मान्यवर उपस्थित होते. 

डॉ. हर्षदिप कांबळे म्हणाले, उद्योग जगत आणि शिक्षण यांचा ताळमेळ नसल्याचे आपल्याला अनेकदा जाणवते. या दोन घटकांचे मिश्रण होणे गरजेचे आहे. आपल्याला फक्त सकल देशांतर्गत उत्पन्नात वाढ महत्वाची नाही तर संशोधन देखील महत्वाचे आहे. त्याशिवाय आपण स्वयंपूर्ण होणार नाही, हे वास्तव आहे. त्यासाठी हे पुस्तक महत्वपूर्ण भूमिका निभावेल.  

लेखक डॉ. जयंत खंदारे म्हणाले, हे माझे तिसरे वैज्ञानिक पुस्तक आहे. विज्ञान इतिहासातील अनुभवलेले दिव्य क्षण आणि गेल्या दोन दशकातील 60 महान वैज्ञानिकांचा अभ्यास यामध्ये आहे. या पुस्तकाचा उद्देश केवळ माहिती देणे नसून विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयी जिज्ञासा निर्माण करणे आहे.

गणेश शिंदे म्हणाले, आपल्याकडे वैज्ञानिक दृष्टिकोन कमी आहे. शिक्षण आणि विज्ञानाची जोड आवश्यक आहे. शिक्षणाकडे उदरनिर्वाह करण्याचं साधन म्हणून आपण जो पर्यंत बघणार तो पर्यंत आपल्याला वैज्ञानिक दृष्टिकोन कळणार नाही.

अध्यक्षीय भाषणात डॉ. कराड यांनी विज्ञान आणि अध्यात्म यांची सांगड असावी असे मत व्यक्त केले.

शशिकांत कांबळे प्रस्ताविक करताना म्हणाले, विद्यार्थ्यांसाठी विज्ञानाचे महत्व अनमोल आहे. विज्ञानामूळे मुलांना जगाकडे अधिक सक्षमतेने पाह‌ण्याची दृष्टी मिळते. या करिता जगभरातील ६० संशोधकाचे चरित्र मराठी भाषेतून मांडण्याचा महत्वपूर्ण प्रयत्न डॉ. जयंत खंदारे यांनी केला आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ऋतुजा फुलकर यांनी केले तर आभार गौरीशंकर आनंद यांनी मानले.

About The Author

Advertisement

Latest News

Advt