- राज्य
- '... अशा याचिका दाखल करणे हा कायद्याचा गैरवापर'
'... अशा याचिका दाखल करणे हा कायद्याचा गैरवापर'
राहुल गांधी यांचे पुण्यातील वकील ॲड. मिलिंद पवार यांचे मत
पुणे: प्रतिनिधी
काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या विरोधात दाखल करण्यात येणाऱ्या विविध याचिका हा कायद्याचा आणि न्याय प्रक्रियेचा गैरवापर असल्याचे मत गांधी यांचे पुण्यातील वकील ॲड मिलिंद पवार यांनी व्यक्त केले. केवळ गांधी यांना न्यायालयीन प्रक्रियेत गुंतवून ठेवण्याच्या विकृत उद्देशाने अशा याचिका दाखल केल्या जात असल्याचे त्यांनी नमूद केले.
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याबद्दल बदनामी करणारी विधाने केल्याबद्दल गांधी यांच्या विरोधात डॉ. पंकज फडणीस यांनी दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने पहिल्याच सुनावणीत फेटाळून लावली आहे.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे नातू सात्यकी सावरकर यांनी याच संदर्भात पुणे येथे फौजदारी खटला दाखल केला आहे. न्यायालयात लवकरच त्याची नियमित सुनावणी सुरू होणार आहे. त्यामुळे या याचिकेवर सुनावणी घेण्याची आवश्यकता नाही, असेही मुख्य न्यायाधीश अलोक आराध्ये आणि न्या. संदीप मारणे यांच्या खंडपीठाने याचिकाकर्ते डॉ. फडणीस यांना सुनावले आहे.
डॉ. फडणीस यांनी काही काळापूर्वी सर्वोच्च न्यायालयात देखील अशाच प्रकारची याचिका दाखल केली होती. ती याचिका देखील सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली होती.