- राज्य
- राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यालयासमोर टायर जाळून आंदोलन
राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यालयासमोर टायर जाळून आंदोलन
छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना झालेल्या संघटनेचे पडसाद
नांदेड :प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना झालेल्या मारहाणीचे पडसाद नांदेड येथेही उमटले आहेत. अजित पवार गटाच्या कार्यालयाबाहेर एकवटलेल्या मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी टायर जाळून निदर्शने केली. कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना जिल्ह्यात फिरू देणार नाही, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
विधिमंडळात कोकाटे रमी खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक सुनील तटकरे यांच्या लातूर दौऱ्यात पत्रकार परिषद सुरू असतानाच छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांमी तटकरे यांच्यासमोर पत्ते टाकून कोकाटे यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली.
त्यानंतर या पदाधिकाऱ्यांना मारहाण करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रवक्ते सूरज चव्हाण यांनी गुंडांना बोलावून ही मारहाण केल्याचा आरोप केला जात आहे.
नांदेड येथे या मारहाणीचा निषेध करण्यासाठी मराठा चळवळीतील आंदोलकांनी टायर जाळून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या व कोकाटे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. पक्षाची यात्रा जिल्ह्यातून जाऊ देणार नाही, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
चुकीच्या गोष्टींचे समर्थन नाहीच: तटकरे
छावा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना झालेली मारहाण निंदनीयच आहे. अशा चुकीच्या गोष्टींचे समर्थन पक्षाकडून केले जाणार नाही. या मारहाणीत चव्हाण यांचा सहभाग असेल तरीही याला जबाबदार असलेल्या सर्वांवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे, असे तटकरे यांनी सांगितले.