- राज्य
- 'काही लोकप्रतिनिधी स्वतःला समजतात फार शहाणे'
'काही लोकप्रतिनिधी स्वतःला समजतात फार शहाणे'
अजित पवार यांनी व्यक्त केला पुतण्यावर संताप
पुणे: प्रतिनिधी
काही लोकप्रतिनिधी स्वतःला जास्त शहाणे समजत आहेत. अशा काही जणांनी चुकीचे वर्तन केले तरी सगळेच बदनाम होत आहेत. कायदा म्हणजे यांना काहीच वाटत नाही. त्यामुळे पत्रकार मित्र आणि सर्वसामान्य जनता देखील त्यांना बोल लावत आहे. असे वर्तन कोणीही करता कामा नये, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे पुतणे आमदार रोहित पवार यांच्या वर्तनाबद्दल संताप व्यक्त केला.
गुरुवारी विधिमंडळात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांच्यासह पोलीस ठाण्यात गेलेल्या रोहित पवार यांनी पोलिसांनाच दम देतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. याप्रकरणी रोहित पवार यांच्यावर पोलिसांची गैरवर्तन आणि सरकारी कामात अडथळा असे गुन्हे देखील आझाद मैदान पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले आहेत. यासंबंधी विचारले असता अजित पवार यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. त्याला कायद्याचा धाक राहिला आहे की नाही, हे विचारतो, असेही ते म्हणाले.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या घटनेबद्दल, कायद्याबद्दल आदर राखून महाराष्ट्राची शालीन परंपरा आणि महाराष्ट्राचे प्रथम मुख्यमंत्री दिवंगत यशवंतराव चव्हाण यांनी दिलेली शिकवण प्रत्येक लोकप्रतिनिधीने आपल्या आचरणात आणली पाहिजे, अशी अपेक्षा देखील अजित पवार यांनी व्यक्त केली.