- राज्य
- कापाकापीमुळे सोलापुरात राष्ट्रवादीची वाट: धैर्यशील मोहिते-पाटील
कापाकापीमुळे सोलापुरात राष्ट्रवादीची वाट: धैर्यशील मोहिते-पाटील
नाव न घेता उपमुख्यमंत्री अजित पवारांवर साधला निशाणा
पंढरपूर : प्रतिनिधी
मागील दहा वर्षात (२००९ ते २०२४) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वाट कोणी लावली, असा सवाल उपस्थित करत माढ्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार धैर्यशील मोहिते- पाटील यांनी थेट नाव न घेता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला.
राष्ट्रवादीमध्ये अनेकजण कापाकापी करण्यासाठी हातात कात्री घेऊन बसले होते. त्यामुळेच सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची पुरती वाट लागली, अशी टीकाही त्यांनी केली.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या जिल्हाध्यक्षपदी वसंत देशमुख यांची निवड करण्यात आली आहे. यानिमित्त कासेगाव येथे खासदार मोहिते- पाटील यांच्या उपस्थितीत ग्रामस्थांनी सत्कार सोहळ्याचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात खासदार मोहिते- पाटील बोलत होते.
ते म्हणाले, राष्ट्रवादीमध्ये अनेकजण कात्री घेऊन बसले होते आणि यातूनच राष्ट्रवादी काँग्रेसची वाट लागली. भैरवनाथ शुगरचे व्यवस्थापकीय संचालक अनिल सावंत, डीव्हीपी उद्योग समूहाचे अमर पाटील, व्यापार उद्योग सेलचे प्रदेश अध्यक्ष नागेश फाटे आदी उपस्थित होते.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची शक्यता धूसर
मोहिते-पाटील यांचे पंख कापण्याचे काम अजित पवार यांच्याकडून होत असल्याच्या चर्चा होत्या आणि यातूनच मोहिते- पाटील हे २०१९ ला भाजपमध्ये गेले होते. मात्र २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने मोहिते- पाटील यांनी पुन्हा शरद पवार गटात प्रवेश करत खासदारकी मिळवली. पुन्हा दोन राष्ट्रवादी एकत्रित येण्याच्या चर्चा सुरू असतानाच खासदार मोहिते पाटील यांच्या या टीकेमुळे दोन्ही राष्ट्रवादी पुन्हा एकत्र येण्याची शक्यता धूसर झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.