सिंहगडाच्या कड्यावरून खोल दरीत कोसळला तरुण
हैदराबाद येथून आलेल्या तरुणाच्या शोधासाठी अनेक पथके रवाना
पुणे: प्रतिनिधी
हैदराबाद येथून आपल्या मित्रांसमवेत पर्यटनासाठी पुण्यात आलेला तरुण सिंहगडावरील तानाजी कड्यावरून खोल दरीत कोसळला आहे. पोलीस, वनविभाग आणि स्थानिक प्रशासनाच्या वतीने या तरुणाच्या शोधासाठी विविध पथके रवाना करण्यात आली आहेत. गौतम गायकवाड (वय 24) असे या युवकाचे नाव आहे.
गौतम आपल्या पाच मित्रांसह हैदराबाद येथून पुण्याला पर्यटनासाठी आला आहे. गुरुवारी हे सर्वजण सिंहगडावर फिरण्यासाठी गेले असता गौतमने मित्रांना लघवीला जाऊन येतो म्हणून सांगितले. बराच वेळ होऊन देखील गौतम परत न आल्यामुळे त्याच्या मित्रांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. हवा पॉईंट जवळ त्याच्या चपला सापडल्या. त्या काळात सिंहगडावर मोठ्या प्रमाणावर पाऊस कोसळत होता. यावेळी वाऱ्याचा वेग ही अधिक होता.
वाऱ्याचा वेग आणि कड्याचे टोक याचा अंदाज न आल्यामुळे पाय घसरून तो दरीत कोसळल असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. रात्री अकरा वाजेपर्यंत त्याचा शोध घेण्याचे काम सुरू होते. मात्र पाऊस आणि अंधार यामुळे शोधकार्य थांबवण्यात आले. सकाळी सहा वाजल्यापासून पुन्हा त्याचा शोध घेण्यात येत आहे.