- राज्य
- 'वाहतुकीची परिस्थिती दाखवा, देशाचे भवितव्य सांगतो'
'वाहतुकीची परिस्थिती दाखवा, देशाचे भवितव्य सांगतो'
वाहतुकीच्या समस्येबाबत राज ठाकरे यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
मुंबई: प्रतिनिधी
तुमच्या देशातील लहान मुलांच्या तोंडावर कोणती गाणी आहेत यावरून मी तुमच्या देशाचे भवितव्य सांगतो, या एका स्कॉटिश सैनिकाच्या विधानानुसार, तुमच्या देशातील वाहतुकीची परिस्थिती दाखवा, तुमच्या देशाचे भवितव्य सांगतो, असे उद्गार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी काढले.
मुंबईसह राज्यातील सर्व शहरांमध्ये वाहतुकीची समस्या बिकट होत असताना त्यावरील उपाययोजनांबाबत राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. वाहतुकीच्या नियोजनाचा, विशेषतः वाहनतळांचा एक नमुना आराखडा त्यांनी मुख्यमंत्र्यांना सादर केला. यावेळी मुंबईचे पोलीस आयुक्त आणि वाहतूक विभागाचे सह आयुक्त देखील उपस्थित होते.
शहरातील वाहनतळाची मोठी समस्या सोडविण्यासाठी मैदानांच्या खाली वाहनतळ उभारण्याची सूचना राज ठाकरे यांनी यावेळी केली. मुख्यमंत्री फडणवीस यांनी त्याला तत्त्वतः मान्यता दिली असून त्यानुसार मुंबई शहरात एक आणि उपनगरात दोन असे मैदानाखाली वाहनतळ उभारण्याबाबत मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे, असे ठाकरे यांनी सांगितले.
राज्यातील सर्व प्रमुख शहरांमध्ये जुन्या इमारतींचा पुनर्विकास मोठ्या प्रमाणावर होत असताना लोकसंख्या वाढ, पर्यायाने वाहनांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे मुंबईसह बहुतेक शहरांमध्ये वाहतुकीची समस्या बिकट झालेली आहे. त्याकडे वेळीच लक्ष दिले नाही, तर शहरातील रस्त्या रस्त्यांवर कोलाहल माजू शकतो, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला.
नगर नियोजन या विषयाला कोणत्या राज्यात महत्त्व दिले जात नाही. नागरिकांकडून वाहतुकीची शिस्त पाळली जात नाही. विशेषतः दुचाकी वाहन चालक सिग्नलची तमा बाळगत नाहीत. अनेक शहरांमध्ये हजारो विनापरवाना रिक्षा आणि टॅक्सी रस्त्यांवर धावत आहेत. या बेशिस्तीला वेळीच आवर घालणे आवश्यक आहे. ही परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर ती हाताळणे अशक्य होणार आहे, असा इशाराही त्यांनी दिला.
परप्रांतीयांचे लोंढे थांबवा
सध्या केवळ मुंबईवरच नव्हे तर ठाणे पुणे नाशिक अशा अनेक शहरांमध्ये देखील परप्रांतीयांच्या लोंढयांचा ताण येत आहे. त्यामुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत. त्यातून मार्ग काढण्यासाठी इतर राज्यांमध्ये शहरे विकसित करून महाराष्ट्रातील शहरांमध्ये येणारे परप्रांतीयांचा लोंढे थांबविणे आवश्यक आहे. मात्र, त्यापूर्वी तातडीने करण्याच्या उपाययोजना हाती घेण्याची त्वरा केली पाहिजे, असेही ठाकरे म्हणाले.
हत्ती आणि कबुतरामध्ये अडकू नका
राज्यात वाहतूक समस्या, अपुऱ्या पडणाऱ्या नागरी सुविधा असे अनेक मूलभूत प्रश्न आ वासून उभे असताना त्यांच्याकडे गांभीर्याने पाहणे ऐवजी आपण हत्ती आणि कबुतरामध्ये अडकून बसलो आहोत, अशी टीका राज ठाकरे यांनी केली. कबुतरांचा प्रश्न राजकीय हेतूने मोठा करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. उंदीर हे गणपतीचे वाहन आहे म्हणून आपण त्याला घरात सांभाळून ठेवत नाही. मग जैन समाजाला कबुतरांचा एवढा कळवळा का, असा सवाल त्यांनी केला. माणसे मेली तरी चालतील पण कबुतरे वाचली पाहिजे, अशी त्यांची भूमिका आहे का, असा प्रश्नही त्यांनी विचारला.