- राज्य
- नव्या वर्षाच्या सुरुवातीला महापालिकांना मिळणार नवे सदस्य
नव्या वर्षाच्या सुरुवातीला महापालिकांना मिळणार नवे सदस्य
प्रभाग रचनेचा आराखडा राज्य सरकारकडून निवडणूक आयोगाला सादर
मुंबई : प्रतिनिधी
राज्यातील महापालिका निवडणुकीसाठी प्रभागाचा आराखडा राज्य शासनाने निवडणूक आयोगाला सादर केला असून वर्ष अखेरीस मतदान होऊन नव्या वर्षात महापालिकांना नवे नगरसेवक आणि महापौर मिळणार आहेत.
विविध महापालिका प्रशासनाने सादर केलेल्या प्रारूप प्रभाग आराखड्यांना मान्यता देऊन नगररचना विभागाने ते निवडणूक आयोगाकडे पाठवले आहेत. त्यांनंतर २५ ऑगस्ट पर्यंत प्रारूप प्रभाग आराखडे जाहीर केले जातील. हरकती सूचनांसाठी सुमारे १५ दिवसांची मुदत देऊन निवडणूक आयोग त्यावर सुनावणी घेईल.
त्यानंतर दहा दिवसात सप्टेंबरमध्ये अंतिम प्रभाग आराखड्यांवर शिक्कामोर्तब केले जाईल. या प्रभागांमध्ये आरक्षणासाठी सोडती काढून आरक्षित प्रभाग निश्चित केले जातील आणि त्यानंतर निवडणुकांची घोषणा करण्यात येईल. त्यानंतर प्रचाराची रणधुमाळी सुरू होऊन वर्षाखेरीस मतदान पार पडेल आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीला नगरसेवक आणि पदाधिकारी निवडले जातील.