आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल
कायद्याचे राज्य नव्हे तर सरकारची मनमानी असल्याचा विरोधकांचा आरोप
मुंबई: प्रतिनिधी
सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर विधानसभा अध्यक्षांची परवानगी घेऊन मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काल जितेंद्र आव्हाड यांचा कार्यकर्ता नितीन देशमुख आणि भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांचा कार्यकर्ता ऋषिकेश टकले यांच्यात विधानभवनाच्या लॉबीतच हाणामारी झाली. या प्रकारानंतर नितीन देशमुख याला रात्री उशिरा पोलीस ठाण्यात नेण्यात येत असताना जितेंद्र आव्हाड पोलिसांच्या वाहनासमोर झोपले आणि देशमुख याला घेऊन जाण्यास विरोध केला. त्यामुळेच त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल झाला असेल तर हे कायद्याचे राज्य राहिलेले नाही. सरकार मनमानी पद्धतीने राज्य चालवत आहे, असा आरोप काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल होणे ही सत्तेची मस्ती आहे. महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याखाली गुन्हा दाखल असलेल्या गुन्हेगारांना विधान भवनात प्रवेश दिला जातो. गोपीचंद पडळकर यांनी नितीन देशमुख यांच्याकडे हात दाखवून मारण्यास सांगितल्याचे सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसून येत आहे, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली. सरकारला विरोध करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करू. त्यांना संपवून टाकू, ही सत्तेची मस्ती असल्याचा आरोपही त्यांनी केला.