- राज्य
- 'निवडणुका जाहीर होतील त्यावेळी युतीबाबत चर्चा करू'
'निवडणुका जाहीर होतील त्यावेळी युतीबाबत चर्चा करू'
ठाकरे गट व मनसेच्या युतीबाबत उद्धव ठाकरे यांचे महत्त्वाचे विधान
मुंबई: प्रतिनिधी
हिंदी सक्तीला विरोध आणि मराठी अस्मितेच्या प्रश्नावर राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि आपला शिवसेना ठाकरे गट एकत्र आले आहेत आणि या मुद्द्यांवर आम्ही एकत्र राहणार आहोत. मात्र, राज्यात सध्या कोणत्याही निवडणुका नाहीत. निवडणुका जाहीर झाल्यावर राजकीय युतीबाबत चर्चा करू, असे विधान ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले आहे.
मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या मीरा रोड येथे होणाऱ्या सभेपूर्वीच उद्धव ठाकरे यांनी महापालिका निवडणुकीत दोन्ही पक्ष एकत्र येणार असल्याबद्दल महत्त्वाचे विधान केले आहे. निवडणुका जाहीर झाल्यानंतर युतीबाबत विचार करू, असे ते म्हणाले.
शालेय अभ्यासक्रमात पहिलीपासून हिंदी भाषेची सक्ती करण्याच्या सरकारच्या निर्णयाविरोधात मनसेने आंदोलन सुरू केले. त्यानंतर उद्धव ठाकरे यांचा गट देखील या आंदोलनात उतरला. सरकारने त्रिभाषासुत्राबाबत शासन निर्णय रद्द केल्यानंतर वरळी येथे मराठी विजय मेळावा पार पडला. या मेळाव्यानंतर मनसे आणि शिवसेना ठाकरे गट महापालिका निवडणूक एकत्रित लढविणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या.
या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी आम्ही एकत्र आलो आहोत ते एकत्र राहण्यासाठीच, असे वक्तव्य करीत युतीबबत संकेत दिले होतेया. मात्र, राज ठाकरे यांची संभाव्य युतीबाबत सावध भूमिका असल्याचे दिसून येते. त्यांनी युतीबाबत कोणतीही जाहीर विधाने करण्यास आपल्या नेत्या, कार्यकर्त्यांना मज्जाव केला आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे यांचे हे विधान महत्त्वाचे आहे.
राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी परिस्थिती
शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासाच्या कॅन्टीन कर्मचाऱ्याला केलेली मारहाण आणि विधानभवनातच भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांची हाणामारी झाली. या पार्श्वभूमीवर ठाकरे यांनी राज्य सरकारवर. कठोर टीका केली. काही दिवसांपूर्वी सत्ताधारी आमदारांची बॉक्सिंग आपल्याला बघायला मिळाली. काल खुद्द विधानभवनातच हाणामारीचा प्रकार घडला. गेल्या काही दिवसांपासून सत्तेचा माज स्पष्टपणे दिसून येत आहे. सर्व पक्षांनी एकत्र येऊन राजकारणातील गुंडांना हद्दपार केले पाहिजे. लोकशाहीचा खून करणारे लोकच विधिमंडळात येत असतील, तर सामान्य माणसाने करायचे काय, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. असे प्रकार यापूर्वी कधी घडले नव्हते. या प्रकारांमुळे देशभरात राज्याची प्रतिमा मलिन झाली आहे. राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करावी अशीच परिस्थिती निर्माण झाली आहे, असे ठाकरे यांनी नमूद केले.