यापुढे विधानभवनात अभ्यागतांना प्रवेश नाहीच

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा महत्त्वाचा निर्णय

यापुढे विधानभवनात अभ्यागतांना प्रवेश नाहीच

मुंबई: प्रतिनिधी 

विधानभवनाच्या लॉबीतच झालेल्या हाणामारीच्या पार्श्वभूमीवर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. या पुढील काळात विधानभवनात अभ्यागतांना प्रवेश दिला जाणार नाही. त्याचप्रमाणे मंत्र्यांनी विधानभवनात बैठका न घेता मंत्रालयातच घ्याव्या, अशी सूचनाही अध्यक्षांनी केली आहे. 

गुरुवारी विधानभवनात भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाली. त्यावरून विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. कायदा सुव्यवस्था स्थितीबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. 

या घटनेनंतर अध्यक्षांनी विधानभवनात अभ्यागतांना प्रवेश करण्यास बंदी घातली आहे. मंत्र्यांनी अपवादात्मक परिस्थितीत विधानभवनात बैठका घेतल्या तरी त्यासाठी अभ्यागतांना प्रवेश दिला जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. 

हे पण वाचा  जनसुरक्षा विधेयकाबाबत काँग्रेसचा बैल गेला आणि झोपा केला

नीतिमूल्य समितीची करणार स्थापना 

विधिमंडळाच्या परंपरांचे पालन करण्याची जबाबदारी यामदरांवर आहे. या ठिकाणाचे पावित्र्य कायम ठेवण्यासाठी सर्वांनी काही नियमांचे पालन करण्याची आवश्यकता आहे. त्या दृष्टीने लोकसभेच्या धर्तीवर विधिमंडळात नीतिमूल्य समितीची स्थापना करण्यात येणार आहे. त्याबद्दल एक आठवड्यात निर्णय घेण्यात येईल, असे नार्वेकर यांनी सांगितले आहे. 

मागील काही काळापासून आमदारांचे वर्तन चिंता निर्माण करणारे आहे. आपण शपथ ग्रहण करताना संविधानाबाबत जे बोलतो ते काटेकोरपणे अमलात आणण्याची आवश्यकता आहे, असे नार्वेकर म्हणाले. यापुढे विधानभवनात केवळ आमदार आणि त्यांच्या स्वीय सहाय्यकांनाच प्रवेश देण्यात येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

लोकशाहीच्या मंदिरात लोकशाही जिवंत 

याबाबत जितेंद्र आव्हाड यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. झालेल्या हाणामारीच्या घटनेशी माझा कोणताही संबंध नाही. घटना घडली तेव्हा मी विधानभवनात नव्हतो. मी कोणालाही खुणा करून चिथावले नाही. मी एकटाच सभागृहात येतो. कोणालाही पास मिळावा यासाठी मी सह्या, शिफारस करत नाही, असा दावा त्यांनी केला. आपल्याला मारण्याच्या धमक्या येत आहेत. आपण त्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना माहिती दिली आहे, असे सांगतानाच आव्हाड यांनी, लोकशाहीच्या मंदिरात लोकशाही जिवंत आहे, असा विश्वास व्यक्त केला. 

About The Author

Advertisement

Latest News

Advt