- राज्य
- 'कोणी कुणाला केवळ युतीसाठीच भेटतात असे नाही'
'कोणी कुणाला केवळ युतीसाठीच भेटतात असे नाही'
देवेंद्र फडणवीस यांनी दिले उद्धव ठाकरे यांच्या भेटीचे स्पष्टीकरण
मुंबई: प्रतिनिधी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना खुद्द सभागृहातच सत्तेत सहभागी होण्याची ऑफर दिली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी उद्धव ठाकरे हे आदित्य ठाकरे यांच्यासह फडणवीस यांना भेटले. या भेटीचा खुलासा सभागृहात करताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, जर कोणी कोणाला भेटत असेल तर प्रत्येक वेळी ती भेट युती करण्यासाठीच असेल असे नाही.
विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या निरोप समारंभ बोलताना फडणवीस यांनी ठाकरे यांना खुली ऑफर दिली. विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर आम्हाला विरोधी बाजूकडे येण्याची संधी नाही. मात्र, तुम्हाला सत्तारूढ पक्षाकडे येण्याची संधी आहे, असे फडणवीस जाहीरपणे म्हणाले. त्यांच्या या विधानाची मोठ्या प्रमाणावर चर्चा देखील झाली.
फडणवीसांच्या या विधानानंतर दुसऱ्याच दिवशी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या भेटीबाबत देखील राजकीय स्वरूपाच्या चर्चा सुरू झाल्या. मात्र, फडणवीस यांनीच या भेटीचे स्पष्टीकरण दिले आहे.
ठाकरे यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत हिंदी भाषा सक्ती, त्रिभाषा सूत्र, विरोधी पक्षनेते पद अशा विविध विषयांवर या बैठकीत चर्चा झाल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले.
हिंदी भाषा शक्ती हवीच कशाला, हे लेखसंग्रहाचे पुस्तक ठाकरे यांनी आपल्याला दिले होते. आपण ते काल वाचल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले. त्याचप्रमाणे पहिली ते बारावी या वर्गांच्या अभ्यासक्रमात हिंदी भाषा सक्ती बाबतचा अहवाल उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळासमोर आला होता. त्यांनी तो स्वीकारलाही होता, असा दावा देखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी बोलताना केला.