केवळ परिस्थिती चिघळू नये म्हणून...
महिला पोलीस अधिकारी धमकी प्रकरणी अजित पवार यांचे स्पष्टीकरण
मुंबई: प्रतिनिधी
धैर्य आणि धाडसाने आपले कर्तव्य बजावत असलेल्या महिला पोलीस अधिकाऱ्याबद्दल आपल्याला आदरच आहे. केवळ परिस्थिती अधिक चिघळू नये, शांतता राहावी, यासाठी आपण संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या, असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहे.
सोलापूर जिल्ह्याच्या माढा तालुक्यातील कुर्डू येथे सुरू असलेल्या अवैध मुरूम उत्खननावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकाला स्थानिकांनी अटकाव केला. त्यातील एका कार्यकर्त्याने अजित पवार यांना फोन केला. त्यांनी फोनवरच कारवाई रोखण्याचे आदेश आयपीएस अधिकारी अंजली कृष्णा यांना दिले. त्याचे ऑडिओ व व्हिडिओ समाज माध्यमातून मोठ्या प्रमाणावर व्हयरल झाले. त्यानंतर अजित पवार यांच्यावर मोठ्या प्रमाणावर टीका करण्यात आली. त्या टिकेला त्यांनी उत्तर दिले आहे.
ही कारवाई रोखण्यामागे कोणत्याही अवैध खाणकामाला पाठीशी घालण्याचा आपला उद्देश नव्हता. कायद्याचे राज्य हीच आपली प्राथमिकता आहे. केवळ घटनास्थळी परिस्थिती शांत रहावी, कायदा सुव्यवस्था स्थिती बिघडू नये याच उद्देशाने कारवाई थांबवण्याची सूचना केली, असे पवारांनी स्पष्ट केले.
या घटनेचे ऑडिओ व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अजित पवार यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली. शासनाची लूट करणाऱ्या अवैध उद्योगांना पाठीशी घालणारे अजित पवार यांना सत्तेत राहण्याचा नैतिक अधिकार नाही, अशी टीका शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली. दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी अर्धा महाराष्ट्र लुटला असून उर्वरित महाराष्ट्र त्यांच्या हस्तकांनी लुटावा यासाठी ते प्रशासनावर दबाव आणत आहेत, असा आरोपही त्यांनी केला.