- राज्य
- '... तर दोन समाजांमध्ये लागतील भांडणे'
'... तर दोन समाजांमध्ये लागतील भांडणे'
प्रकाश आंबेडकर यांचे मराठा समाजाला आवाहन
पुणे: प्रतिनिधी
गरीब मराठा समाजाने इतर मागास प्रवर्गातून आरक्षण न मागता स्वतंत्र आरक्षण मागावे आणि यापुढील काळात मराठा व ओबीसींनी आरक्षणवाद्यांना मत देऊन निवडून आणावे, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी केले.
ओबीसी नेते प्रा. लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वाखाली बारामती येथे काढण्यात आलेल्या जाब मोर्चाच्या समारोपाला झालेल्या सभेमध्ये आंबेडकर यांचा प्रा हाके यांच्या मोबाईलवर फोन आला. फोनवरूनच त्यांनी सभेला संबोधित केले.
गरीब मराठा समाजासाठी आरक्षण मागत असताना ते ओबीसी कोट्यातून मागू नका. स्वतंत्र आरक्षण मागा. तेच टिकाऊ आरक्षण ठरेल. आतापर्यंत तीन वेळा मराठा समाजाला इतर मागास प्रवर्गातून देण्यात आलेले आरक्षण न्यायालयात टिकलेले नाही. मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देता येणार नाही हे न्यायालयाने स्पष्ट केले आहे, याची जाणीव आपण मराठा आरक्षण आंदोलकांना यापूर्वीच करून दिली होती, असा दावा आंबेडकर यांनी केला.
आपण आपल्या विचाराची लोक निवडून दिली तर सरकार आपले म्हणणे ऐकते. आपण कोणाला निवडून देतो हे महत्त्वाचे असते. त्यामुळे मराठा, ओबीसी समाजाच्या मतदारांनी यापुढे आरक्षणवाद्यांना मते देऊन निवडून आणावे, असे आवाहनही आंबेडकर यांनी केले.
या सभेत प्रा हाके यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्यासह पवार कुटुंबीयांवर कठोर टीका केली. पवार कुटुंबीयांनीच ओबीसी आरक्षण संपुष्टात आणल्याचा आरोप त्यांनी केला.